गडकरींविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार

नागपूर :१७ जुलै-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आल्यानंतर या याचिकेतील काही भाग वगळण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे याविरोधात याचिकाकर्त्यांनी आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती दिली. परिणामी, न्या. अतुल चांदुरकर आणि न्या. गोविंद सानप यांनी सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली.
नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभा उमेदवारी अर्ज भरताना खोटी माहिती सादर केल्याचा आरोप करून, त्यांची निवडणूक अवैध ठरवण्याची विनंती करणारी याचिका नफीस खान यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने याचिकेतील काही मुद्दे वगळण्याचे आदेश याचिकाकर्त्यांना दिले होते. याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले की, वगळण्यासाठी सांगण्यात आलेले मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्या मुद्यांवरूनच गडकरी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती सादर केल्याचे स्पष्ट होते. ते मुद्दे हटवल्यास याचिकाच निष्प्राण होईल. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती खान यांनी यावेळी दिली. त्याकरिता न्यायालयाने सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली. याचिकाकर्त्यांतर्फे अँड. श्रीधर पुरोहित यांनी बाजू मांडली.

Leave a Reply