नवी दिल्ली:१७ जुलै- पंतप्रधान, राष्ट्रपती, गृहमंत्री यांच्या सुरक्षा व्यवस्थेस प्राधान्य द्यायला हवेच, मात्र, अति तेथे माती झाली तर तो टवाळखोरीचाच विषय होतो, असं म्हणत शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. वाराणसीत झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी १५०० कोटींच्या अनेक विकास प्रकल्पांचा शिलान्यास केला. या कार्यक्रमावेळी लोकांच्या तोंडावरील काळे मास्क आणि डोक्यावरील काळ्या टोप्या हटवण्यात आल्या. सुरक्षेचा भाग म्हणून हे करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मात्र, या मुद्द्यावरून शिवसेनेनं केंद्राला लक्ष्य केलं. इतके तगडे व मजबूत नेतृत्व असतानाही देश व जनता सुरक्षित नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील सभांत काळे मास्क आणि काळ्या टोप्या उतरवण्यात आल्या हे त्या भयाचेच लक्षण नाही काय?, असा सवाल शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे.
पंतप्रधान, राष्ट्रपती, गृहमंत्री यांच्या सुरक्षा व्यवस्थेस प्राधान्य द्यायला हवेच. काळे मास्क काढण्याचे कारण काय? आपल्या देशात पंतप्रधानांच्या सभांना यापुढे ‘काळे’ मास्क चालणार नाहीत, असा अप्रत्यक्ष आदेश पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे, अशी टीका शिवसेनेनं केली आहे. वाराणसीच्या या सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोकही त्यांच्या गणवेषात मोठ्या कौतुकानं हजर होते. त्या स्वयंसेवकांच्या डोक्यावरच्या काळ्या टोप्याही सुरक्षा रक्षकांनी काढायला लावल्या. ऐकावे ते नवलच, असा हा प्रकार आहे. हे सर्व करण्याआधी सरकारने एकच करावे, एक अध्यादेश काढून काळे मास्क व काळ्या टोप्या यावर बंदीच घालावी, असा चिमटा शिवसेनेनं काढला आहे.