नागपूर: १७ जुलै- उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी मध्यरात्री नागपुरातील गणेशपेठ परिसरात छापा टाकून तीन जणांना अटक केली. प्रसाद रामेश्वर कांबळे, कौसर आलम शोकत अली खान व भूप्रियबंडो देवीदास मानकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. एक महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने धर्मांतर रॅकेट उघडकीस आणले होते. त्याप्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,एटीएसने अटक केलेला प्रसाद हा गणेशपेठेतील राहुल कॉम्पलेक्समध्ये राहतो. तर, कौसर आलम हा झारखंडमधील धनबादमधील लोहिचारा येथील रहिवासी आहे. मानकर हा गडचिरोलीतील चामोर्शीतील वायगाव येथे राहतो.
एक महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने धर्मांतर करणारे रॅकेट उघडकीस आणले होते. याप्रकरणात गोमतीनगर पोलिस स्टेशनमध्ये धर्मांतरविरोधी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. एसटीएसने यावेळी अटकेतील आरोपींकडून एक डायरीही जप्त केली होती. यात महाराष्ट्र, केरळ, हरयाणा, आधंप्रदेश व दिल्लीतील रॅकेटच्या सदस्यांची नावे होती. तेही या कटात सहभागी झाल्याचे त्यावेळी निष्पन्न झाले होते.
कांबळे हा दोन साथीदारांसह नागपुरातील घरी दडून बसल्याची माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली. शुक्रवारी मध्यरात्री एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने राहुल कॉम्प्लेक्समधील फ्लॅट क्रमांक २०२ मध्ये छापा टाकला. एटीएसच्या पथकाने प्रसाद, कौसर व मानकरला अटक केली. मध्यरात्रीच एटीएसचे पथक तिघांना घेऊन लखनऊकडे रवाना झाले.