आमदार अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात

मुंबई:१७ जुलै-एमएमआरडीएने मेट्रो स्टेशनबाबत केलेली कारवाई आणि मुंबईत कुरार मेट्रो स्टेशनच्या कामाचा वाद रंगला आहे. या कामाला विरोध करणाऱ्या रहिवाशांवर पोलिसांनी कारवाई केली. कारवाईला विरोध करण्यासाठी आंदोलन करणारे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भातखळकर यांनीही ट्विट करून माहिती दिली आहे. मला अटक करण्यात आल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे.
आज शनिवारी सकाळी कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी परिसरातील घरांवर कारवाई करण्यात आली. कारवाई सुरू झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी याला विरोध केला. त्याचवेळी भातखळकर यांनी तिथे धाव घेत विरोध केला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उद्घाटनाच्या चमकोगिरीसाठी कुरारमधील मराठी माणसांची घरे तोडली. लोकांना मारहाण केली. या विरोधात आवाज उठवल्याने मला अटक करून आरे पोलीस ठाण्यात नेत आहेत, असे अतुल भातखळकर यांनी ट्विट करताना म्हटले.
मराठी माणसाचे नाव घेऊन पक्षाचे दुकान चालवायचे आणि एका स्थानकाच्या उद्घाटनासाठी लोकांना उद्ध्वस्त करायचे. त्यांचे आहे तिथे पुनर्वसन का नाही? गिरगाव पॅटर्न का नाही, असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.

Leave a Reply