अमरावती : १७ जुलै – पोलंड येथे युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहे. यासाठी मंजिरी आलोने हिची मुलींच्या भारतीय संघात धनुर्विद्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकावर निवड झाली आहे. ही निवड चाचणी हरियाणा राज्यातील सोनिपत येथे पार पडली. मंजिरी ही अमरावती जिल्ह्यातील नांदगांव खंडेश्वर येथील एकलव्य धनुर्विद्या अकादमी तथा एकलव्य गुरुकुल स्कूलमधील नववीतील विद्यार्थ्यांनी आहे. मंजिरी सध्या सोनिपत (हरियाणा) येथे सुरु असलेल्या भारतीय संघाच्या सराव शिबिरात आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा सराव करत आहे. पोलंड येथे होणाऱ्या धनुर्विद्या स्पर्धेसाठी मंजिरी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
विशेष म्हणजे एकलव्य धनुर्विद्या अकादमीमध्ये नियमित सराव घेणारे (एनआयएस) कोच अमर जाधव यांची सुद्धा भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. ते भारतीय संघाला सोनिपत येथे मार्गदर्शन करत आहेत. ते पोलंड येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी संघ घेऊन जाणार आहेत. नांदगावच्या इतिहासात प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.
मंजिरी आलोने नांदगाव खंडेश्वर येथील सावनेर या खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील आहे. तिचे वडिल वामन महाराज विद्यालय सावनेर येथे लिपिकाची नोकरी करतात. तिच्या आई रंजना आलोने गृहिणी आहेत.
मंजिरी गेल्या तीन वर्षांपासून एकलव्य धनुर्विद्या अकादमीमध्ये शिकत आहे. तिला खेळामध्ये रुची आहे. त्यामुळे इंग्लिश शाळेचा प्रवेश रद्द करून तिने एकलव्य गुरुकुल स्कूल मराठी शाळेमध्ये फक्त खेळामध्ये रुची असल्याने प्रवेश घेतला. ती आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे स्वप्न घेऊन शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त तथा अकादमीचे संस्थापक-मार्गदर्शक सदानंद जाधव यांच्या मार्गदर्शनात सराव करत होती. आता तिचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
मंजिरीने आजपर्यंत तीन राष्ट्रीय स्पर्धा खेळून एका सुवर्णपदकासह अनेक पदके प्राप्त केली आहेत. मंजिरीची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय निवड चाचणी होती. पहिल्याच चाचणीत तिने बाजी मारली आहे. तिने पोलंड येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये पदक जिंकण्याची जिद्द बाळगली आहे.