संजय राठोड यांना क्लीनचिट देणे चिंताजनक – चंद्रकांत पाटील

मुंबई : १६ जुलै – “संजय राठोड आमचे दुश्मन नाहीत, शिवसेना तर बिलकुल नाही, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिल्याची चर्चा आहे. त्याबाबत चंद्रकांत पाटलांनी भाष्य केलं.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “संजय राठोड यांना क्लीन चीट देणं चिंताजनक आहे. संजय राठोड यांच्याबाबतची जनहित याचिका कोर्टात आहे. हा न्यायालय आणि पोलीस प्रशासनाचा विषय आहे. तसेच त्यांना मंत्रिमंडळात घ्यावं की घेऊ नये हा शिवसेनेचा विषय आहे. त्यांच्यावर आरोप आहेत की नाही हे चारही बाजूने पाहून घ्या. राठोड काही आमचे दुश्मन नाहीत आणि शिवसेना तर आमची बिलकुल दुश्मन नाही. एखाद्याने गुन्हा केला तर त्याला शिक्षा होते. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे गुन्हेगाराला शासन होतं हे सामान्य लोकांना वाटतं”
एकीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राठोड प्रकरणात नरमाईची भूमिका घेतली असताना, तिकडे भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मात्र आक्रमक पवित्रा घेतला आहे. चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
“आज सकाळी मी बातम्या पहिल्या. शिवसेना नेते संजय राठोड यांना क्लीन चीट देण्याची बातमी होती. त्यामुळे मी आज सकाळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी बोलले. त्यांनी क्लीन चीट दिली नसल्याचं सांगितले. मात्र पोलिसांनी प्रेस घेऊन किंवा नोट काढून माहिती द्यावं”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
राज्यभरात गाजलेल्या एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांसमोर तरुणीच्या आई वडिलांनी जबाब नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राठोड यांचा मंत्रिमंडळात परतण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.
आमचा कोणावरही आरोप नाही, मुलीच्या मृत्यूनंतर या विषयाला राजकीय वळण दिले गेले. त्यानंतर जे काही घडले तो सर्व पॉलिटिकल ड्रामा होता, असा जबाब तरुणीच्या पालकांनी पुण्यातील वानवडी पोलिसांकडे नोंदवल्याची माहिती आहे.

Leave a Reply