मुंबई : १६ जुलै – राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं आज हृदयक्रिया बंद पडल्याने मुंबईत निधन झालं. त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्या प्रदीर्घ काळापासून आजारी होत्या. २०१८ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तसंच २०२० साली ब्रेन स्ट्रोकचा त्रासही त्यांना झाला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. आज सकाळी त्यांची हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचं निधन झालं.
सुरेखा यांनी आत्तापर्यंत नाटकं, मालिका, चित्रपट सर्वच क्षेत्रात काम केलं. १९७८ सालच्या ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटविश्वात पदार्पण केलं होतं. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. त्यांना ‘तमस’ (१९८८), ‘मम्मो’ (१९९५) आणि ‘बधाई हो’ (२०१८) या चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले होते. त्यांना १९८९ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. त्यांचे वडील भारतीय हवाई दलात होते तर आई शिक्षिका होती. त्यांनी हेमंत रेगे यांच्याशी लग्न केलं. या दोघांना राहुल नावाचा एक मुलगाही आहे.
सुरेखा यांना त्यांच्या ‘बालिका वधू’ या मालिकेमधल्या भूमिकेने घराघरात पोहोचवलं होतं. तर ‘बधाई’ हो या चित्रपटातली त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. या भूमिकेसाठी त्यांना २०१८ साली राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या व्हिलचेअरवरुन आल्या होत्या.