यवतमाळात ३८ लाखाचा गुटखा जप्त

यवतमाळ : १६ जुलै – ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत येणाऱ्या जांबबाजार येथील शेत शिवारातील गोदामावर गुन्हे अन्वेषण पथकाने धडक धाड टाकून तब्बल ३८ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू जप्त केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पुसद ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत पोलिसांच्या नाकावर टिच्चून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधी पान मसाला व गुटख्याची विक्री आणि मोठा साठा असल्याची खात्रीलायक माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यावरून सकाळी ११ च्या दरम्यान जांबबजार शेतशिवारातील गोदामावर सापळा रचून गुन्हे अन्वेषण पथकाने धडक धाड टाकली.
या गोदामामधून तब्बल ३२ लाख ९९ हजार ९०४ रुपयांचा राजनिवास कंपनीचा सुगंधी तंबाखू व अवैध गुटखा तसेच टाटा कंपनीचे चारचाकी वाहन किंमत अंदाजे ५ लाख असा एकूण ३७ लाख ९९ हजार ९०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. एक जण पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या धाडीदरम्यान अटक केलेल्या आरोपींची नावे शेख आतिक शेख मोईन, ताहेर अहमद, मोहंमद अहमद अशी आहेत. तर शेख तारीक शेख मोईन हा घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.
ही कारवाई गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल पुरी, सपोनि विवेक देशमुख, सपोनि गजानन करेवाड, जमादार गजानन डोंगरे, विशाल भगत, मोहंमद भगतवाले, शेख सलमान, उल्हास कुरकुटे, कविश पालेकर, चौधरी यांनी मोठ्या शिताफीने धडक कारवाई केली आहे. त्यामुळे पुसद शहर व तालुक्यात अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे गुन्हे अन्वेषण विभागाला अवैद्य धंदे करणार्याची माहिती मिळते, परंतु स्थानिक पोलिसांना मात्र या धंद्यांची जराही माहिती नसते. त्यामुळे या अवैध धंदेवाल्यांसोबत स्थानिक पोलिसांचे साटेलोटे आहे की काय, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

Leave a Reply