कहर झाडा-झडत्यांचा… – माधव पाटील

सांप्रत राज्यात तिपाई-तीन पक्षांचे सरकार अस्तित्वात आहे. अस्तित्वात असले तरी ते दिवसेंदिवस चाचपडते आहे एवढेच. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे हे आघाडी सरकार म्हणजे कुणी सत्तेच्या लालसे पायी याला तीन चाकी-तीन पायाचे संबोधतात. आणि म्हणतात कसे, ही तीन पायाची अडथळ्याची शर्यत पार पडेल काय ? एकूणच सत्तारूढ काय अन् विरोधक काय त्यांच्याबाबत काय बोलावे हे सामान्य जनतेला मात्र कळेनासे झाले आहे. होळीच्या पर्वावर जसा शिगमा होतो, बैलांच्या पोळा सणाला (काव्यात्मक) झडत्या ऐकावयास मिळतात, तसं काहीसं हल्ली या राजकारणात सत्तारूढ-विरोधकांच्या परस्परांविरुद्धच्या आरोप-प्रत्यारोप, उखाळ्या-पाखाळ्यांनी कहर केला आहे.
हल्ली हा तर, ‘रात्रंदिवस खेळ चाले’ (मध्यरात्रीसुद्धा) एक राजकीय उपक्रम नित्याचा झाला आहे. हा खेळ जित्या जाणत्या-भल्या (की अजाणत्या) राजकीय ने त्यांचा की गल्लीबोळातल्या भांडखोर बाल गोपाळांचा हा प्रश्न पडावा. गिल्ली दांडूच्या खेळात गिल्ली उडाली तरी गलका न उडाली तरी गलका ऐकावयास मिळतो. एकमेकांची मने जुळावयास वेळ लागतो पण भांडायला वेळ लागत नाही. पूर्वी तमाशा फडात कलगीतुरा ऐका-पहावयास मिळत होता. हल्लीच्या राजकारणात मैं मैं- तू तू ऐकावयास मिळते. जशी दिवाळीत गल्लीबोळातली पोरं रस्त्यावर येवून फटाके उडवितात, कुणी तोटा, कुणी सुतळी बॉम्ब तर कुणी अग्निबाण. यातही स्पर्धा असतेच. एकाने फटाका फोडला रे फोडला की त्यावर ताण म्हणून दुसराही लगेच फटाके फोडू लागतो. हल्लीच्या राजकारणातही अगदी असेच फटाके दररोज फुटू लागले आहेत. संत तुकोबारायांचे, शब्द हेचि धन आम्हा-शस्त्रचि हे आठवून पहा. अलीकडचे राजकारणी कुठलेही सोयरसुतक न बाळगता शब्दांचा विश्वास दाखवण्याऐवजी शब्दांचा घाव घालू लागले आहेत. मग ते आघाडीतले असो की बिघाडीतले- एकाच माळेचे मणी, काय चाललंय काय राजकारणात बरे ?
हल्ली राजकारणातल्या ‘नाना’ तऱ्हेच्या तसेच जाणत्या-अजाणत्या बड्या बड्या (त्यात विरोधकहि आले) नेत्यांचे विचार करू नका. २० टक्के राजकारण ८० टक्के समाजकारण बाजूला पडलं. समाज जावून नुसता माज आलाय असं वाटावं. परवा-परवा शरदचंद्र पवार (साहेब) म्हणाले, नाना अजून लहान आहे. हे असं नेत्या-कार्यकर्त्यांना लहान म्हणणं बरं नव्हं. हे असं बोलणारे (विश्वासघात करता करता) लहानाचे मोठे झाले, त्यांना हे कसं कळणार ? अशा महाभागांना मोठ्या मनाचे म्हणायचे की कोत्या मनाचे हे तुम्हीच ठरवा. भिजलेल्या नाकर्तेपणाच्या घटनारूपी आठवणी उंबऱ्यात अडकल्या असतील याचा शोध घ्या. विनाकारण दरवाजा घट्ट झाला म्हणून पावसाला दोष देवू नका पवार साहेब. “इतरांना लहान म्हणून माणूस मोठा होत नसतो. म्हातारचळ तर लागलं नाही ना, हा वास येवू लागतो.” ही सुद्धा एक झडतीच समजा ‘बैलां’च्या पोळ्यातली…

                                    - माधव पाटील, पुसद

Leave a Reply