एकाचवेळी ३० नागरिक विहिरीत पडले चौघांचा मृत्यू

भोपाळ : १६ जुलै – मध्य प्रदेशची राजधानी भोपाळहून जवळपास १२० किलोमीटर अंतरावर विदिशा जिल्ह्यातील गंजबासौदामध्ये गुरुवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडलीय. लाल पठार गावात विहिरीत पडलेल्या एका मुलाला वाचवण्यासाठी जमा झालेल्या गर्दीतील जवळपास ३० लोक विहिरीत पडलेत. या लोकांचं बचावकार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत या विहिरीतून चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर जवळपास १९ जणांना वाचवण्यात यश मिळालंय.
गंजबासौदाच्या लाल पठार गावात गुरुवारी सायंकाळी ६.०० वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. एक १४ वर्षीय मुलगा खेळता खेळता अनावधानानं या परिसरात खोदलेल्या एका विहिरीत पडला. ही विहीर जवळपास ३० फूट खोल आहे. तसंच विहिरीत १० ते १५ फुटांपर्यंत पाणी आहे. मुलगा विहिरीत पडल्याचं लक्षात येताच विहिरीभोवती मदत करणाऱ्यांची आणि बघ्यांची गर्दी गोळा झाली.
मात्र, या विहिरीच्या कठड्यावरील जमीन खचलेली होती. विहिरीला वरतून सिमेंटेड स्लॅबनं झाकण्यात आलं होतं. लोकांची एकच गर्दी गोळा झाल्यानं हा स्लॅबही अचानक कोसळला आणि स्लॅबवर उभे असलेले ३० हून अधिक लोक विहिरीत एकावर एक पडले. घटनेची माहिती मिळताच तत्काळ प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळे पोहचले. जेसीबी मशीनसहीत बचावकार्य आणि मदतकार्य सुरू करण्यात आलं. मात्र, रात्री ११.०० वाजल्याच्या सुमारास बचावकार्यात वापरला जाणारा आणखी एक ट्रॅक्टर जमीन खचल्यानं कोसळला.
एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून या भागात रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येतंय. आतापर्यंत १९ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात जवानांना यश आलंय. तर चार मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती विदिशा जिल्ह्याचे प्रभारी मंत्री विश्वास सारंग यांनी दिलीय. अद्यापही काही लोक बेपत्ता असल्याचं समजतंय.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तत्काळ एनडीआरएफ, एसडीआरएफच्या टीम्स भोपाळकडे बचावकार्यासाठी रवाना केल्या होत्या. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तसंच जखमींना ५० हजार रुपयांचं आर्थिक सहाय्य तसंच जखमींना मोफत उपचाराची सोय देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलीय.
या घटनेची माहिती मिळाली तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे विदिशातच आपल्या दत्तक घेतलेल्या मुलींच्या विवाहात उपस्थित होते. दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी विवाह स्थळालाच आपला कंट्रोल रूम बनवलं. इथून तत्काळ त्यांनी पोलीस महानिरीक्षक, आयुक्त, जिल्हाधिकारीसहीत सगळ्या अधिकाऱ्यांना बचावकार्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री चौहान स्वत: या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. आपण सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून सांगितलं.

Leave a Reply