वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली १५०० कोटीच्या विकासकामांची घोषणा

लखनऊ : १५ जुलै – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशातील वाराणसी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोदींनी काशी वाराणसीतील जनतेला तब्बल १५०० कोटींच्या विकासकामांची घोषणा केली. ज्यामध्ये बहुचर्चित रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरचाही समावेश आहे. गेल्या सात वर्षातील मोदी २७ व्यांदा वाराणसी दौऱ्यावर आले आहेत. मोदींनी बनारस हिंदू विद्यापीठातील १०० बेडच्या चाईल्ड हेल्थ विंगचं उद्घाटन केलं.
पंतप्रधानांनी इथे डॉक्टरांशीही संवाद साधला. तसंच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतला. त्याआधी त्यांनी एका सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं. काशी-वाराणसी भरभरुन देते. या शहरावर महादेवाचा आशिर्वाद आहे. काशीवासियांना विकासाची गंगा बहाल केली आहे, असं मोदी म्हणाले.
योगी आदित्यनाथ यांची कर्मठता आणि मेहनत यामुळे काशी आणि उत्तर प्रदेशचा विकास होत आहे. आज काशीमध्ये सर्व आजारांवर उपचार होत आहेत. यापूर्वी उपचारांसाठी दिल्ली किंवा मुंबईला जावं लागत होतं.
यावेळी पंतप्रधानांनी बनारस हिंदू विद्यापीठातील ला १५०० कोटी रुपयांच्या विकासनिधीची घोषणा केली. आज त्यांच्या हस्ते जपानच्या सहयोगाने बनवण्यात आलेल्या रुद्राक्ष कन्वेंशन सेंटरचं उद्घाटन होत आहे.
वाराणसीतील सिगरा इथं १८६ कोटी रुपये खर्चून रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आलं आहे. जपानच्या सहाय्याने याची रचना करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये इंडो-जपान कला आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळते. काशी-क्योटो कार्यक्रमांतर्गत भारत आणि जपानच्या मैत्रीचा नमुना म्हणून रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरकडे पाहिलं जातं.
शिवलिंगाच्या आकृतीत हे रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर आहे. या सेंटरमध्ये स्टीलचे १०८ रुद्राक्ष बसवण्यात आले आहेत. रुद्राक्षाची माळ १०८ खड्यांची असते, त्यानुसार त्याची रचना करण्यात आली आहे.
रुद्राक्ष इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरचं डिझाईन जपानची कंपनी ओरिएंटल कन्स्लटंट ग्लोबलने बनवलं आहे. तर त्याची उभारणीही जपानच्याच फुजिता कॉरपोरेशनने केली आहे. इथे मोठे म्युझिक कॉन्सर्ट, कॉन्फरन्स, नाटक होऊ शकतात.

Leave a Reply