वयाच्या सातव्या वर्षी राघव पाठकने पटकावले नेदरलँड राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद

नागपूर : १५ जुलै-वयाच्या सातव्या वर्षी राघव पाठक याने नेदरलँड येथे झालेल्या डच राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावून नवा इतिहास घडवला आहे. मूळ नागपूरकर असलेल्या सात वर्षीय राघवने टाळेबंदीत बुद्धिबळाचे धडे घेत अल्पकाळातच आपला ठसा उमटवला आहे. त्याला भविष्यात ग्रॅण्डमास्टर बनायचे आहे.
शहरातील मनीषनगर येथील रहिवासी वासुदेव नाकाडे व वसुधा नाकाडे यांचा नातू राघवचा जन्म नागपुरात झाला. मात्र, तो गेल्या चार वर्षांपासून अँम्सटरडॅम येथे आपल्या पालकांसोबत राहतो.
राघवला बुद्धिबळाचा परिचय त्याचे वडील विलास पाठक यांनी करून दिला. त्यानंतर त्याने बुद्धिबळाचे ऑनलाईन धडे अमरावतीचे श्याम आवघाड यांच्याकडून घेतले. त्यानंतर परदेशात गेल्यावर व्हीएएस बुद्धिबळ क्लबमध्ये प्रवेश मिळवला. एका वर्षांपूर्वी राघवने अँम्सटरडॅम आंतर क्लब स्पर्धा जिंकली, त्यानंतर विभागीय स्पर्धा गाजवली आणि थेट राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळवले. राघवच्या यशामुळे नागपूरचे नाव विदेशातही गाजले आहे.

Leave a Reply