मुंबई: १५ जुलै-राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी ३००पेक्षा जास्त खासदार असलेल्या पक्षाचा उमेदवार असेल. देशातील या सर्वोच्चपदाच्या निवडणुकीत मी उमेदवार होणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. मी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार असल्याच्या बातम्या अत्यंत चुकीच्या आहेत. या निवडणुकीचा निकाल काय येईल, त्याबद्दल सर्वांनाच माहिती असल्याचे स्पष्टीकरणही शरद पवार यांनी दिले आहे.
सार्वत्रिक निवडणूक फार दूर असून, देशातील राजकीय परिस्थिती बदलतच आहे. पुढील निवडणुकीत मी कोणतेही नेतृत्व स्वीकारणार नसल्याचेही पवार यांनी सांगितले.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वारंवार भेटी घेत आहेत. पवार हे राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच या बातम्या चुकीच्या असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
शरद पवार म्हणाले, प्रशांत किशोर यांच्याशी दोनदा भेट झाली. परंतु, त्यांच्या एका कंपनीबद्दलच चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणूक वा राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी नेतृत्वासंबंधी कोणतीही चर्चा झाली नाही. माझ्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी निवडणुकीची रणनीती आखण्याचे काम सोडले आहे. विशेष म्हणजे, प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर दिल्लीतही दोन बैठका पार पडल्या होत्या. त्यावेळी शरद पवार पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीसाठी चाचपणी करत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात देशभरात रंगली होती.