पोलिसांच्या मारहाणीतच आदिवासी युवकाचा मृत्यू , व्हावी उच्चस्तरीय चौकशी – हंसराज अहिर

चंद्रपूर : १५ जुलै – रेल्वे पोलिसांनी चोरी प्रकरणात अटक केलेल्या तरुणाची प्रकृती सोमवारी रात्री अचानक बिघडल्याने त्याला बल्लारपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, रात्री १० वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. हा मृत्यू रेल्वे पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.
राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथील अनिल गणपत मडावी (२९) असे मृतकाचे नाव आहे. अनिल मागील पाच दिवसांपासून घरी गेला नव्हता. २५ हजार रुपये किंमतीचे तांब्याची तार चोरी प्रकरणात बल्लारपूर रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. याबाबतची माहिती नातेवाईकांना देणे गरजेचे असताना पोलिसांनी ही माहिती दिली नाही. दरम्यान, पोलिसांच्या मारहाणीत अनिलचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
संशयित आरोपी म्हणून रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या अनिल मडावी या आदिवासी युवकाचा मृत्यू पोलिसाच्या मारहाणीमुळेच झाल्याचा गंभीर आरोप माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी व दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे केली आहे.
रेल्वे पोलिसांनी परवा आदिवासी समाजातील या युवकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. परंतु, 13 जुलै रोजी मृतकाच्या आईला त्यांच्या मुलाच्या मृत्यूची बातमी दूरध्वनीवरून देण्यात आली व त्याचे पार्थिव घरी घेवून जाण्याचा रेल्वे पोलिसांनी निरोप दिला. केवळ दिखावा म्हणून मृतकास बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. त्या युवकाचा मृत्यू हा फीट आल्याने झाल्याचा बनाव रेल्वे पोलिसांनी केला असला, तरी मृतकाच्या आईच्या म्हणण्यानुसार त्याला फीट किंवा अन्य कोणताही आजार नव्हता. त्यामुळे हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाला असल्याने दोषी रेल्वे पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, असे अहिर यांनी म्हटले आहे.
तर हे प्रकरण केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्यामुळे या गुन्ह्याची चौकशी आरपीएफकडून काढून सीबीआयकडे सोपवली, तरच ती चौकशी निष्पक्षपपणे होऊन मृतकाच्या कुटुंबाला न्याय मिळेल, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अॅंड. वामन चटप, बाजार समिती माजी सभापती प्रभाकर ढवस, माजी जि. प. समाजकल्याण सभापती नीळकंठ कोरांगे, शेषराव बोंडे, कपिल इद्दे आदींनी केली आहे.

Leave a Reply