मुंबई: १५ जुलै-राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी आज गुरुवारी सकाळी भेटीसाठी पोहोचले होते. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, यासंबंधी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली.
छगन भुजबळ हे ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी मला इम्पेरिकल डेटा कसा गोळा करता येईल यासंबंधी माझं मत जाणून घेतलं. यावेळी मी त्यांना मराठा आऱक्षणावेळी कसा इम्पेरिकल डेटा गोळा केला आणि तो सर्वोच्य न्यायालयाने कसा वैध ठरवला, याची माहिती दिली, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसंच त्यांनी पुढाकार घ्यावा, एजन्सी नेमाव्यात, आमच्याकडून पूर्ण मदत केला जाईल, असं आश्वासनही दिल्याचं फडणवीसांनी यावेळी सांगितलं. सर्वोच्य न्यायालयाने कोरोनामुळे निवडणुकीच्या संदर्भातील अधिकार निवडणूक आयोगाने दिले आहेत. सध्याच्या निवडणुका आयोगाने पुढे ढकलल्या आहेत. पण फेब्रुवारीत महत्वाच्या निवडणुका होणार आहेत, असं यावेळी फडणवीस म्हणाले. याप्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते.