अमरावती : १५ जुलै – मोर्शी ते अमरावती मार्गावरील येरला गावानजीक असलेल्या हनुमान मंदिराजवळ अज्ञात चार मोटर सायकलस्वारांनी टाटा पिकअप ही मालवाहू गाडी थांबवून चालकाला मारहाण केली व त्याच्या जवळचे अंदाजे चार लाख रुपये घेऊन पळ काढला. सदर घटना दुपारी पावणे चार वाजता घडली.
माहितीनुसार, अमरावतीच्या कॉटन मार्केट येथील आकाश एजन्सीचे संचालक व किराणा व्यवसायिक बंटी वसंतवाणी यांच्या दुकानातला किराणा माल एमएच २७/ बीएक्स – ४७०७ क्रमांकाच्या गाडीने चालक वरुड येथे घेऊन गेला होता. वरुड येथील विविध व्यापार्यांना माल देऊन रोख रक्कम घेऊन तो अमरावतीच्या दिशेने निघाली होता. मोर्शी शहरातून अमरावतीच्या दिशेने जात असताना येरला नजीक असलेल्या हनुमान मंदिराजवळ अमरावतीकडे जाणार्या चार अज्ञात हिरोहोंडा चालकांनी मालवाहू गाडी थांबविली. चार मोटर सायकलवर अंदाजे आठ व्यक्ती होते, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. चालकाला गाडीच्या बाहेर काढले. तुझ्या गाडीने अपघात झाल्यावर तु गाडी का थांबवली नाही, असा जाब विचारून मारहाण सुरू केली.
दरम्यानच ताब्यात असलेली पैशांची बॅग त्यांनी हिसकली आणि अमरावतीच्या दिशेने पसार झाले. गाडीचा चालक मोहम्मद जुनेद अब्दुल रशीद (३०) रा. अकबर नगर, अमरावती जखमी अवस्थेत तेथेच पडून होता. मार्गावरून जाणार्या लोकांची त्या ठिकाणी गर्दी झाली. याचवेळी विजय सोमवंशी त्यांच्या शेतातून घरी येत होते. त्यांनी सदर प्रकार पाहून मोर्शी पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक संजय सोळंके व अन्य पोलिस अवघ्या काही क्षणात घटनास्थळावर पोहचले. जखमीला दवाखाण्यात नेले. पोलिसांनी घटनेची माहिती गुन्हे शाखेला दिली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी कविता फरतडे, गुन्हे शाखेच्या चमूने भेट देऊन तपास सुरू केला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.