पंकजा मुंडे – जमीन धुंडे
मित्रांनो आज पंकजा मुंडेंचा दूरदर्शन वर भाषण ऐकत होतो. खरंच् भारतीय राजकारण अजुनही ,”ओबीसी समाज” गोपीनाथ मुंडे यांच ओबीसी समाजाला देणं आणि मग मला बाबांचं राहिलेलं कार्य पुर्ण करायचं आहे वगैरे वगैरे आणि मग शेवटी ज्या दिवशी “राम” नाही असं वाटेल त्या दिवशी…..
पंकजाताई नी आपला नेता म्हणून मोदी, अमित शहा, नड्डा ही नावे घेतली. ज्या लोकांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. नावात दम आहेच. ज्यांच्या कर्तृत्वाचा फौलाद आंतरराष्ट्रीय स्तरावर डौलाने चमकतोय, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताची ध्वजा उंचावली आहे, अशा व्यक्तींना आपले नेते म्हणून मान्यता देण्यात, पंकजाताई चुकल्या नाही. पण आमच्या काही नेत्यांना महाभारतातील प्रसंग, धर्मयुद्ध वगैर वगैरे उगीचच बरळायची सवय कारण लोकं टाळ्या पिटतात. कौरव कोणाला म्हणावं? पाच गावे मागितली होती – दिल्या गेली नाही आणि धर्मयुद्ध झाले. म्हणजे पंकजाताई ना असे तर म्हणायचे नाही की एक मंत्री पद प्रीतम मुंडेंचे मागितले होते, मोदी कौरवा तू दिले नाही. आता धर्मयुद्ध अटळ आहे म्हणजे काय तर मी पाला बदलण्याच्या तयारीत आहे. अरे ! पंकजाताई आप कहना क्या चाहती हो !!!!
मागे पंकजाताई चे भाषणात “बंड” हा शब्द आला तर त्यांनी लगेच बंडावर दोन चार उदाहरणे दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी बंड केले नसते तर स्वराज्य मिळाले नसते, ज्योतिबा फुलेंनी बंड केले नसते तर स्त्री शिक्षण वगैरे वगैरे, पंकजाताई हे बंड आणि एखाद्याला मंत्री पद नाही मिळाले किंवा निवडून नाही आले तर करण्यात येणारे बंड, ह्यात फरक आहे. त्यांच्या बंडात देशाला, भारताला सुशिक्षित करण्याची जिद्द आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बंडामुळे आज तुम्ही “पंकजा” नावाने ओळखल्या जाता, सलमा किंवा बेगम नावाने नाही. तर तुमच्या बंडात अहंकार, स्वार्थ लपला आहे. “आडात नाही तर पोह-यात कुठुन येणार?” ही उपमा एका युवा नेत्याला लागु होते. तुमच्या बाबतीत मात्र आडात होते पण पोहरा सक्षम नव्हता, ते आपल्या बाबांचं वज्र पेलायला – असेच म्हणावे लागेल.
आज तुमचे भाषण राजनैतिक संकुचित मानसिकता दाखवते. ज्या वेगाने मागल्या सहा वर्षात बदल झालेत भारतात तो वेग सगळ्यांना झेपेल? जो कामाचा आवाका, निस्वार्थी सेवाभाव आणि निर्णय घेवून, भिजत घोंगडे न ठेवता, नितीनियम लागू करून, नवीन निर्णय कार्यान्वित करण्याची पद्धती भारताला नवीन आहे.
ह्या निमित्ताने मला सांगावेसे वाटते की कॉंग्रेस पार्टी चे राज्य होते त्यावेळी गॅस सिलेंडर साठी मारामारी करण्याची वेळ यायची. गॅस सिलेंडर मध्ये भ्रष्टाचार, भारतीय सैन्य शस्त्रात भ्रष्टाचार, सरकारी कचे-यात भ्रष्टाचार, सगळी कडे भ्रष्टाचाराला कुरवाळत, कॉंग्रेस राज्य करीत होती आणि एकदम एक निस्वार्थी मोदी आले. स्वार्थी राजकारण्यांच्या पचनी नाही पडले आणि सगळ्यांचे धाबे दणाणले. तरी पण मोदींना आपल्या राजकारणातल्या मर्यादा आहेत. आरक्षण मिटविणे, हटवणे तितकेसे सोपे नाही. आज आरक्षणाचा बकासुर ओपन कॅटेगरीच्या बुद्धीमत्तेला आणि त्यांच्या शिक्षण शुल्काला गिळंकृत करीत आहे. आणि सत्तर वर्षे झाल्यानंतर देखील राजकारण्यांनी ओबीसी आरक्षण, मायनॉरिटी आरक्षण, अलाना आरक्षण, फलाना आरक्षण. म्हणून सर्व देश पन्नास टक्के आरक्षणाने व्यापून टाकला आहे.आणि सवर्ण समाज त्या वर्गाचे पैसे आपल्या खिशातून देत आहे. सवर्ण समाज दोन्ही कडून लाथा खात आहे. इकडे गुणांची टक्केवारी आणि जास्त शैक्षणिक शुल्क, ज्याला आपण “फी” असे म्हणतो. आता तुम्ही म्हणाल मी ह्यात नवीन काय बोलतो आहे? सगळ्यांना सगळं कळतंय पण मार्ग काढायला वळंत नाही. मार्ग तर मला ही सुचंत नाही. मात्र हे जी लिडरशीप ज्या नेत्यांकडे आहे, तेच् नेते आपले व्होट बँक म्हणून असल्या लोकांना भडकवंत असतात.
आता आजच्या पंकजा मुंडेंच्या भाषणात काही नवीन स्पार्क होता का? त्यांनी आपल्या समाजाची पत आणि उंची वाढविण्याची काही मार्गदर्शन पर दोन शब्द बोलल्या का? राजीनामे परत करताना त्यांचा टोन कसा होता? आपले शक्तिप्रदर्शन करण्याचा दर्प होता. काही समाज आजच्या त्यांच्या भाषणातून बोध घेऊ शकतो का? आज खरे म्हणजे त्यांचा चाहता वर्ग एकत्रित झाला होता आणि त्यांच्या समाजाच्या विकासपर काही मार्गदर्शन करता आले असते पण ही संधी, नाव न घेता, त्यांनी फडणवीसांवर चिखलफेक करण्यात व्यर्थ दवडली. मला संपवण्याचा प्रयत्न….. वगैरे वगैरे वायफळ गप्पा आणि टीव्ही फुटेज… राजकारण मुळात कुरघोडी करण्याचा प्रांत, आपले अस्तित्व टिकविण्यासाठी सगळे नेता लोक शर्थीचे प्रयत्न करतात आणि तुम्ही अस्तित्वाच्या भितीपोटी हबकुन जाता हे अतर्क्य आहे. तुमच्यासारखे फडणवीसांना सुद्धा राजकारण हा प्रांत वडिलोपार्जित वसा म्हणून मिळाला. माननीय गंगाधर फडणवीस हे राजकारणी होते आणि त्यांचा वसा समर्थपणे चालवित आहेत. नागपूर च्या माणसाने मुंबई वर राज्य करणे सोपे नाही. अशा गोष्टींची पोटदुखी म्हणजे मविआ आघाडी आहे. दुसरे असे राजकारणातील दोघांचे वजन बघितले तर तुमची बाजू डावी पडते. जी तडफ फडणवीसात आहे ती तडफ आणि तल्लखता, तुमच्या ठिकाणी येणे शक्य नाही. उगीच भाजपा सोडून गेलेले नेते, तुम्हाला बोलावित असतील किंवा शिवसेना तुम्हाला तुकडे टाकत असेल आणि त्या बळावर आजचे तुमचे शक्तिप्रदर्शन असेल तर पंकजा ताई तुमचे अस्तित्व तुम्ही स्वतः संपवित आहात. दुस-यांना दोष देण्यात अर्थ नाही.
ओबीसी समाजाला मार्गदर्शन करणारा नेता, समाजाला सत्तर वर्षानंतर कसे म्हणू शकतो की बाबांचं अपुर्ण कार्य पुर्ण करायचे आहे. माननीय गोपीनाथ जी असताना परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी राजकारणात पाय रोवायला एक साधा सुलभ मार्ग होता. पण आज ती परिस्थिती नाही. सत्तर वर्षात जर परिस्थिती बदलू शकली नाही तर सवर्णांच्या तीन ते चार पिढ्यांचे बलिदान देऊन, भारत ह्या राष्ट्राने काय साध्य केले? आज आरक्षित समाजाला लहानपणापासून बाळकडू पाजले जाते की “आरक्षण” आपला हक्क आहे. आणि नेते मंडळी त्याला प्रोत्साहित करत असतात. किती आरक्षित वर्गाला “राष्ट्र भक्ती, राष्ट्र प्रेम, राष्ट्रासाठी त्याग, राष्ट्राय स्वाहा – इदं न मम” असे किती टक्के लोकांना शिकविले जाते? काय हे सगळे प्रकार सवर्णांसाठी आहेत? आणि आपल्या पिढ्यांना शिकविण्यासाठी आहेत की आरक्षण असलेल्या लोकांसाठी हे राष्ट्र आहे आणि आता ते “स्वाहा” होण्याच्या सीमेवर आहे? आम्ही आमच्यावेळी काही करू शकलो नाही आरक्षणा विरुद्ध, तुम्ही पण म्हणा “सरकारी जागा – इदं न मम” आरक्षित त्या जागेवर बसून म्हणतील ,”ही सीट – राष्ट्र स्वाहा – इदं मम”. अतिशय बिकट परिस्थिती.
ह्या सर्व परिस्थितीतून खरोखर बाहेर पडायचे तर संपूर्ण भारतातल्या कच्च्या बच्च्यांना राष्ट्र भक्तीचे धडे द्यावे लागतील. त्यांचा स्वाभिमान लहान पणापासून विकसित करावा लागेल आणि एक दोन पिढी खर्ची घालावी लागेल जी म्हणेल स्वाभिमानानी की “आम्ही सक्षम आहोत बौद्धिक दृष्ट्या – आरक्षणाची कुबडी आता आम्हाला नको. आम्ही सक्षम आहोत आर्थिक स्तरावर, शैक्षणिक शुल्क भरण्याची आमची पात्रता आहे.” तर ह्या आरक्षण पद्धतीला विराम लागण्याची शक्यता चिन्हांकित होवु शकते अन्यथा तुम्ही परत भाषणामध्ये तेच तेच कोकलणार, मला बाबांचे स्वप्न पुर्ण करायचे आहे. ओबीसी समाजाला आरक्षण कायम ठेवायचे आहे.
पंकजा ताई तुम्हाला मिळालेली जागा तुमच्या बाबांमुळे आहे हे मान्य. भारतात हीच मोठी शोकांतिका आहे. लायक आणि जबाबदार व्यक्ती डावलले जातात आणि रक्ताच्या नात्याचे लोकं, स्वतः चा हक्क समजून “आरक्षित” समजून वसा चालवण्याचा प्रयत्न करतात. ह्यात पंकजा ताई दोन गोष्टी आहेत, स्वबळावर-स्वनिष्ठेनी-स्वकर्तृत्वानी कमावलेली पत व आयती मिळालेली वडिलोपार्जित खुर्ची, ह्या दोहोंमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. अशा लोकांकडून राजकारणाच्या स्तराला जी उंची अपेक्षित असते ती मिळंत नाही. आणि मग जमले तर ठीक नाहीतर तर “राम” आठवतो. मग त्यांना पण इतर पक्ष चांगले वाटायला लागतात कारण तिथे स्वकर्तृत्वाचा “कस” बघितल्या जात नाही तर बिकाऊ मालाची किंमत लावून विकत घेतल्या जातो. सरतेशेवटी त्याचा उपयोग मोदींच्या घोडदौडीत अडंगे टाकण्यासाठी लावल्या जातो. पंकजाताई तुम्हाला ठरवायचे आपण कुठे बसतो ते! तुमच्या भाषणात तुम्ही पाय दोन्ही पलड्यात ठेवला. मोदींची स्तुती आणि मोदी कौरव. तुमच्या जाण्याने भाजपाला खुप हानी होणार नाही पण व्यक्तिगत रित्या तुम्ही संपून जाल. पाला बदलायचे तर नाथा भाऊ बघा, त्यांचे घड्याळाने बारा वाजवले आणि कुठलेही पद किंवा मोठी जागा त्यांना देण्यात आली नाही.
एक नेता ह्या नात्याने समाजाला उंची देण्याचे काम करणार की आपला समाज “मागासवर्गीय” आहे ह्याचा ढिंढोरा पिटणार? बाबांच्या नावाने बोंबलंत राहणार की स्वतः चा काही ठसा उमटवणार?सगळ्याच लोकांना आयती संधी मिळत नसते, तुमच्या बाबांनाही नव्हती मिळाली. पण त्यांनी संधी साधली आणि संधी चं सोनं केलं. तुम्ही मात्र संधी साधताहात-सत्तेमध्ये भागिदारी किंवा मंत्रिपद का नाही मिळालं, प्रीतम मुंडेंना? तुमची समस्या म्हणजे देशाची समस्या नाही. देशाची समस्या सोडविण्यासाठी खरं म्हणजे “मंत्री” च झाले पाहिजे का? काय फक्त मंत्री च् देश चालवताहेत? दुसरा पर्यायच नाही???? की पर्याय मिळाला म्हणून मोदींना धमकी? की तुमचा व्यक्तिगत स्वार्थ आडवा येत आहे? कोणी ही येरा-गबाळा सांगू शकतो, नियत काय आणि कुवत काय !
आज तुमची मिटींग म्हणून खुप अपेक्षेने दूरदर्शन समोर बसलो होतो पण तुमच्या भाषणात, तुमच्या नितीमत्तेत, तुमच्या स्वकर्तृत्वात आणि वक्तव्यात काही “राम” नव्हता हे च् म्हणेन. ऐरा गैरा सांगू शकतो की शक्ति प्रदर्शन करण्याची, ही उचित वेळ नाही आणि मोदींच्या रडारवर शिक्कामोर्तब करण्यासाठी कामगिरीची दखल घेण्याइतपत, कामाची उंची लागते. बाबांच्या कारकिर्दीची नाही. “राम” तुमच्यात पाहिजे तर लोकं तुम्हाला “राम राम” करतील. तुमच्यातील कर्तृत्वाचा “राम” जर नाही उमगला तर तुम्ही परत येण्यासाठी “जमीन” शोधत राहाल. अन्यथा हीच् योग्य वेळ आहे भाजपाने तुम्हाला राम राम करून तुमची गच्छंती करण्याची.
भाई देवघरे