संपादकीय संवाद – सक्षम नेता ठरवून विरोधकांचे ऐक्य करण्याचा प्रस्ताव हे संजय राऊत यांचे स्वप्नरंजन

देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाला सक्षम पर्याय निर्माण करायचा असेल तर सर्वप्रथम सर्व विरोधी पक्षांचा एक नेता ठरायला हवा असे विधान शिवसेनेचे प्रवक्ते आणि दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांनी केल्याची बातमी आहे. राऊत यांनी केलेले हे विधान त्यांच्यातील सुजाण पत्रकार आणि राजकीय विश्लेषकाची जाणीव करून देणारे आहे. असे म्हणता येईल.
आपल्या देशाचा स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास बघता जेव्हा जेव्हा सत्ताधारी पक्षाला असा सर्व विरोधकांनी एकत्र येऊन सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा नेता कोण या मुद्यावरच विरोधकांचे ऐक्य स्वप्नवत राहिले आहे. आजही या परिस्थितीचा विचार केल्यास नेता कोण? हा वाद पुढे येणार हे निश्चित आहे. सध्या भाजपेतर विरोधी पक्ष बघितल्यास त्यात ६-७ तरी पंतप्रधानपदाचे दावेदार निश्चित सापडतील अगदी नावे घ्यायची झाल्यास शरद पवार, १९९१ पासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. पंतप्रधान होता यावे म्हणून तर त्यांनी १९९९ मध्ये काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा संसार थाटला होता. त्यामुळे पवार हे आजही रांगेत आहेतच त्यांच्यापाठोपाठ पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी याही दंड थोपटून तयार आहेत. यांच्यासोबत बिहारचे नितीश कुमार, कर्नाटकातील देवेगौडा, काश्मीरमधील फारुख अब्दुल्ला उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव, आणि मायावती असे सर्वच पंतप्रधान पदाचे इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वी दस्तुरखुद्द संजय राऊत यांनीच आपल्याला उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान झालेले बघायला आवडेल कारण त्यांच्यात ती क्षमता आहे असे विधान करून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे हे सर्व दावेदार भाजपला पर्याय देण्यासाठी आपापले पक्ष घेऊन एकत्र येतीलही मात्र नंतर पंतप्रधान कुणी बनायचे यासाठी भांडतील हे सांगायला कोणत्याही ज्योतिष्याची गरज नाही.
१९७७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन जनता पक्ष बनवला होता. त्यावेळी मोरारजी देसाईंना पंतप्रधान बनवले होते, मात्र त्याकाळात चौधरी चरणसिंग आणि बाबू जगजीवनराम हे दोघेही पंतप्रधान पदाचे दावेदार होते. या दोघांच्या महत्वाकांक्षेमुळेच अवघ्या अडीच वर्षात जनता सरकार कोसळले आणि इंदिरा गांधींना सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न फसला.
यानंतर १९८९ मध्येही जनता दलाला निसटते का होईना (तोडजोड करून) बहुमत मिळाले होते, त्यावेळीही व्ही. पी. सिंग आणि चंद्रशेखर यांच्यातल्या वादाने सरकारची वाट लागली. नंतर १९९६ मध्ये देवेगौडा आणि गुजराल यांचा प्रयोगही असाच फसला हा इतिहास बघता सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी एक नेता ठरवून सत्तेजवळ पोहोचले तरी हे सर्व पंतप्रधान पदाचे दावेदार किती काळ एकत्र टिकतील हा प्रश्नच आहे. परिणामी दार सहा महिन्यांनी सरकार अस्थिर होत जाईल कदाचित प्रत्येक दावेदाराला सहा महिन्यांची मुदत देऊनच पंतप्रधान करायचे असाही प्रयोग केला जाऊ शकेल यात सर्व भावी पंतप्रधानांची हौस फिटेल जरूर मात्र राजकीय अस्थैर्यामुळे देशाचे वाटोळे व्हायला वेळ लागणार नाही.
हा लेख लिहीत असतानाच संजय राऊत यांचे आणखी एक विधान पुढे आलेले आहे, त्यांच्यामते सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणून त्यांना नेतृत्व देण्याची क्षमता शरद पवारांमध्ये आहे, हे संजय राऊत यांचे आजचे मत झाले. मात्र संजय राऊतांना कधीतरी उद्धवपंतानाही पंतप्रधान बनवायची इच्छा आहे. हे विसरून चालणार नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा हा सल्ला म्हणजे स्वप्नरंजनाचं ठरणार आहे. हे सांगायला कोणत्याही ज्योतिष्याची गरज पडणार नाही.

अविनाश पाठक

Leave a Reply