नवी दिल्ली : १४ जुलै – केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना बढती देण्यात आली आहे. त्यांची राज्यसभा सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या जागी त्यांची वर्णी लागली आहे. थावरचंद गहलोत यांची कर्नाटक राज्यपालपदी नियुक्ती केल्यानंतर ही जागा रिक्त होती. नुकताच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आला असून अनेकांची खाती बदलण्यात आली आहेत. आता पियूष गोयल यांच्याकडे वाणिज्य मंत्रिपद आहे. तसेच खाद्य आणि आपूर्ती मंत्रालयाची जबाबदारी देखील आहे. त्याचबरोबर टेक्स्टाइल मंत्रालयाचा प्रभार देखील देण्यात आला आहे. १९ जुलैपासून संसदेचं अधिवेशन सुरु होत आहे. त्यापूर्वी त्यांच्या खांद्यावर सभागृह नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्टपर्यंत असणार आहे.
मोदी सरकारमध्ये यापूर्वी राज्यसभेचं सभागृह नेतेपद अरुण जेटली यांच्याकडे होतं. त्यांचं निधन झाल्यानंतर ही जबाबदारी थावरचंद गहलोत यांच्याकडे आली. आता या पदावर पियुष गोयल यांची वर्णी लागली आहे. संसदीय राजकारणात पियुष गोयल यांना देण्यात आलेली ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. पियुष गोयल २०१० पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांचे विरोधकांशी सलोख्याचे संबंध असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचं बोललं जात आहे.
संसदेचं पावसाळी अधिवेशन २६ दिवस असणार आहे. सुट्ट्या पाहता संसदेचं कामकाज १९ दिवस चालणार आहे. या १९ दिवसात मोदी सरकार संसदेच्या पटलावर ३० विधेयकं मांडण्याच्या तयारीत आहे. यात १७ विधेयकं नविन तर अन्य विधेयकात सुधारणेबाबत सूचना असणार आहे. दुसरीकडे काँग्रेस अधीर रंजन चौधरी यांच्या जागेवर राहुल गांधी यांची नियुक्ती लोकसभा नेतेपदी करण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनात काँग्रेस करोना संकट, लसीकरण, इंधन दरवाढ, महागाई, बेरोजगारी, राफेल या सारख्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरणार आहे.