पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीचे आमंत्रण नव्हते : नाना पटोले

मुंबई : १४ जुलै- शरद पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीचे मला आमंत्रण नव्हते. ओबीसी आरक्षणांच्या मुद्दांवरुन काँग्रेस नेत्यांसोबत ही बैठक झाली,असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मंगळवारी भेट घेतली. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात पुढाकार घेणारे शरद पवार हे पटोलेंच्या विधानामुळे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. पवारांची नाराजी दूर करण्याची काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी पवार यांची ही भेट घेतली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित नव्हते. याबाबत नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना आज बुधवारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. २०१४ च्या निवडणुकीप्रमाणे धोका होऊ शकतो म्हणून स्वबळावर लढण्याची तयारी सुरु आहे. आगामी काळात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सत्ता येईल. काँग्रेसचा विस्तार करण्याची माझ्यावर पक्षाने जबाबदारी दिली आहे.

Leave a Reply