कॅबिनेट समित्यांची फेररचना, गुंतवणूक समितीमध्ये नारायण राणेंचा समावेश

नवी दिल्ली : :१४ जुलै-केंद्रीय मंत्रिमंडळातील व्यापक फेरबदलानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विषयवार कॅबिनेट समित्यांचीही पुनर्रचना केली असून, नव्या मंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या ‘गुंतवणूक व वृद्धी’ समितीमध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांचा समावेश झाला आहे.
पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील अत्यंत महत्त्वाच्या राजकीय व्यवहार समितीमध्ये भूपेंद्र यादव, सर्वानंद सोनोवाल, मनसुख मंडाविया यांच्यासह स्मृती इराणी व गिरीराज सिंह यांना स्थान मिळाले आहे. मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्याने रविशंकर प्रसाद, हर्षवर्धन यांना वगळण्यात आले आहे. दिवंगत रामविलास पासवानही या समितीचे सदस्य होते. ही समिती प्रामुख्याने राज्य-केंद्र संबंधाच्या मुद्दय़ांवर निर्णय घेते.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामकाज समितीमध्ये माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र सिंह, विधिमंत्री किरण रीजिजू व आदिवासी विकास खात्याचे मंत्री अर्जुन मुंडा यांचा समावेश करण्यात आला आहे. संसदेच्या अधिवेशनाची तारीख-कालावधी, विधेयके-प्रस्ताव आदी मुद्दय़ांवर या समितीत चर्चा केली जाते.

Leave a Reply