मुंबई::१४ जुलै-वारकरी संप्रदायामध्ये आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, करोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरापासून आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारी रद्द करण्यात आल्या. यंदाही करोनाच्या संकटामुळे आषाढी वारी रद्द करण्यात आली. मात्र, या निर्णयावर भाजपाकडून करण्यात आलेल्या टीकेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.त्यानंतर आज भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
सरकारी कार्यक्रम धूमधडाक्यात साजरे करणाऱ्या खंडणी सरकारने आषाढी एकादशीच्या वारीवर, मात्र बंदी घातली. आपल्या संतप्त भावनांना वारकऱ्यांनी अचूक शब्दात व्यक्त केल्या, उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा, म्हणजे थोडक्यात तुमच्या योग्यतेप्रमाणे काम करा, अशी टीका भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
दरम्यान, करोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी तिसरी लाट येण्याचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अद्यापही निर्बंध पूर्णपणे हटवण्यात आलेले नाहीत.