नागपूर: १3 जुलै- रेल्वे व टपाल विभागाच्या संयुक्त पार्सल सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही सेवा अधिक व्यापक होण्याच्या दृष्टीने देशभरात चार ठिकाणी नॅशनल ट्रान्सशिपमेंट सेंटर उभारले जात आहेत. भौगोलिकदृष्ट्या नागपूरचे महत्त्व लक्षात घेता एक सेंटर नागपूर जवळच्या बुटीबोरीत असणार आले. याठिकाणी बांधकामही सुरू झाले असून, सहा महिन्यात ते पूर्ण होणार आहे.येथील केंद्रामुळे देशभरातील पार्सल वाहतुकीला वेग येईल, असे रेल्वे मेल सर्व्हिसचे अधीक्षक बी.व्ही. रमण्णा यांनी सांगितले.
पहिल्या टाळेबंदीदरम्यान, संपूर्ण रेल्वेची चाके थांबली. रस्ते वाहतूकही बंदच असल्याने वैद्यकीय साहित्याच्या वाहतुकीचा गहन प्रश्न निर्माण झाला. त्याचवेळी रेल्वे आणि टपाल विभागाने पार्सल सेवा सुरू केली. खाजगी कंपन्यांपेक्षा कमी दरात पार्सल वाहतुकीचा पर्याय उपलब्ध असल्याने या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसाठी रोड ट्रान्सपोर्ट नेटवर्क उभे झाले. पुणे, मुंबई आणि हैदराबादहून आलेली वैद्यकीय उपकरणे आणि जवळपास २ हजार रिकामे सिलेंडर्स देशाच्या विविध भागात पाठविली गेली.