फक्त आम आदमी पक्षानेच माझं लक्ष्य आणि काम ओळखलं – नवज्योत सिंह सिद्धू

नवी दिल्ली : १३ जुलै – आगामी वर्षात पंजाब विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. यापूर्वीच मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवज्योत सिंह सिद्ध यांचे बिघडलेले संबंध वेळोवेळी समोर येत असतानाच सिद्धू यांची आम आदमी पक्षाकडे असलेली ओढ उघडपणे समोर आलीय. यामुळे, पंजाबचं राजकारणचं बदलण्याची चिन्हं दिसून येत आहेत.
‘आमचे विरोधी आम आदमी पक्षानं नेहमीच पंजाबसाठी असलेलं माझं लक्ष्य आणि काम ओळखलंय. २०१७ सालापूर्वीची गोष्ट असो किंवा आज जसं मी पंजाबचं मॉडेल सादर करतोय, पंजाबसाठी कोण लढत आहे हे लोकांना माहीत आहे’ असं सिद्धू यांनी म्हटलंय.
दीर्घकाळापासून काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवज्योत सिंह सिद्धू यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. सिद्धू यांना काँग्रेस पक्षात आणि पंजाब सरकारमध्ये महत्त्वाचं पद हवंय. तर अमरिंदर सिंह यांना मात्र सिद्धू मंत्रिमंडळात किंवा पंजाब काँग्रेस प्रमुख म्हणून नकोय. सिद्धू किंवा अमरिंदर सिंह यांच्यापैंकी कुणीही नमतं घेण्याच्या तयारीत नाहीत.

अमरिंदर सिंह आणि नवज्योत सिंह सिद्धू यांचं ही लढाई दिल्लीपर्यंतही पोहचलीय. यावर पक्षनेतृत्वानं वादावर तोडगा काढण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला.
याच दरम्यान काँग्रेस नेतृत्व पंजाबमध्ये पक्षात मोठा फेरबदल करण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. यात पंजाब काँग्रेस अध्यक्ष सुनील जाखड यांची खुर्चीही पणाला लागलीय. जाखड यांच्या जागेवर लवकरच नवीन प्रदेश काँग्रेस अध्यक्ष येईल, अशी माहिती काँग्रेस महासचिव आणि पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांनी दिलीय. तसंच मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या मंत्रिमंडळात नवीन चेहरे दिसून येतील, असंही त्यांनी म्हटलंय.
दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही सिद्धूंचं कौतुक केलं होतं. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीपूर्वी सिद्धू आपच्या गोटात शिरणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलंय.

Leave a Reply