नागपूर : १3 जुलै- पूर्व नागपुरातील पारडी येथील मनोज ठवकर याने केवळ मुखपट्टी घातली नाही, या कारणावरून पोलिसांनी त्याला केलेली मारहाण आणि त्यात त्याचा झालेला मृत्यू ही हत्याच आहे. या प्रकरणातील दोषी पोलिसांची बदली करून चालणार नाही, तर त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.
फडणवीस यांनी ठवकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना भाजपकडून दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केली. यावेळी आमदार कृष्णा खोपडे व भाजप शहर अध्यक्ष व आमदार प्रवीण दटके उपस्थित होते. मारहाणीच्या घटनेचे व्हिडीओही त्यांनी पाहिले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, मनोजने मुखपट्टी घातली नव्हती म्हणून त्याला मारहाण करण्यात आली व त्यात त्याचा मृत्यू झाला. ही एकप्रकारची हत्याच आहे. मुळात मुखपट्टी न घालणे हा दंडात्मक गुन्हा आहे. त्याला मारहाण करण्याची गरज नाही, मात्र मनोजला काठी तुटेपर्यंत मारहाण करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला व दोषी कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. पण, नुसती बदली करून चालणार नाही, तर तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलिसांना निलंबित करावे. पोलीस दलात शिस्त असणे आवश्यक आहे. ठवकर यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करावी व त्यांच्या पत्नीला सरकारी सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली. या प्रकरणी गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. टाळेबंदीच्या काळात गुन्हेगारी कमी होण्याऐवजी ती १४ टक्क्यांनी वाढली याकडे त्यांनी लक्ष वेधले.