तसा ‘ज्येष्ठ’ लागला की विठुरायाच्या पंढरीचे अन त्यावरील अपार भक्तीचे वारे वाहू लागते. या शिवारातून त्या शिवारात पायदळी वारीचे ढोल वाजू लागतात. मंदिरांच्या पारावरुन टाळ मृदंगाच्या निनादात आणि माऊलीच्या भेटीसाठी अधीर झालेल्या भक्तांच्या पदन्यासात पंढरपूरा जातो मी चा एकच गजर होतो. ज्ञानेश्वर माऊली-ज्ञानराज माऊली तुकाराम चे स्वर जणू भूपाळी बनतात. या भक्तीरसात आषाढ कधी येतो ते कळतच नाही. साडे तीनशेहून अधिक वर्षांची परंपरा म्हणून कोणती पालखी अन कोणता झेंडा घेवू हाती अशी वारकरी टाळकऱ्यांची अवस्था होते. हळू हळू सुखी संसाराची गाठ सोडून वारकरी चालू लागतो ती पंढरीची वाट…
पण ही शतकानुशतकाची पायदळ वारीची, ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय व इतर वंदनीय संतांच्या पादुकानिशी पालख्यांची परंपरा काल-परवाच्या मेल्या त्या कोरोना महामारीपायी खंडली. कोरोनाचा कहर, थांबला भक्तीचा जागर । संसर्गजन्य विषाणूंमुळे जिती जागती भक्तीही लॉकडाऊन झाली. कोरोनाच्या या गेल्या १-१ वर्षातल्या त्सुनामीनं वारीचं सारं मुसळ केरात गेलं. पंढरपूरा जातो मी म्हणणारा आज दुसऱ्या वारीला मुकला आणि आपुल्या घरा जातो मी म्हणत घरीच स्थिरावला. टाळ चिपळ्यांच्या ऐवजी त्याच्या हातात सॅनिटायझर-साबण आले. पदन्याचा ठेका चुकला अन घरातच पाय झाडायची वेळ आली. ‘माझी भक्ती माझ्या दारी’ म्हणायची या कडक निर्बंधानं पाळी आली. ‘दादा’ म्हणे उभे रहावे – जे जे सांगू ते ते ऐकावे । ही वेळ आली (की आणली !). बारामतीच्या दादांनी म्हणे वारकरी संघटनांच्या विश्वस्तांना म्हणे चक्क बजावलं, कोरोना सांगतो आहे – आपआपल्या दारी सुखी रहा – ना पालखी ना पायदळ वारी. आज दादांचा हा संदेश जरा हटके गावोगावच्या चावडीवर, देवळाच्या पारावर ऐकू येतोय तो असा, “तेथे पाहिजे जातीचे, वारकरी म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे नव्हे. उठसुठ कुणीही उठावं आणि पायदळ वारी काढावी.” खरं आहे एका अर्थानं दादांचं ही विठ्ठलाच्या दारी पायदळवारी म्हणजे पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाचा मेळावा, मंत्र्या-आमदार पुत्राचा लग्नसोहळा वा आरक्षणासंबंधीचा एल्गार नव्हे. आम्ही मेंढरं-मेंढरं-कुणीही यावं आणि हाकावं. पण हाकण्यारांनो लक्षात ठेवा, हा वारकरी भक्त येडा नाही. देव नाही देव्हाऱ्यात-देव आहे तो हृदयात. हृदयाच्या गाभाऱ्यातुन आम्ही सारे भक्त साद घालू…
क्षमा करी हरी । चुकली पायी वारी
संकट आले भारी । कोरोना रूपे ।।
– माधव पाटील, पुसद