ढगफुटीमुळे देशभरातील पर्यटक अडकले

धर्मशाळा: १3 जुलै- हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा आणि परिसरात ढगफुटीमुळे प्रचंड पूर येऊन त्यात शेकडो गाड्या वाहून गेल्या आहेत. देशभरातून मोठ्या संख्येत आलेले पर्यटक यात अडकून पडले आहेत. सिमल्यात प्रचंड पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद असून, दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्येही तुफान पाऊस पडत आहे. या पावसाचा पर्यटकांना मोठा फटका बसला आहे.
उत्तर भारतात पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे पावसाचे रौद्ररूप पाहायला मिळाले. ढगफुटी झाल्याने येथील भागसू परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. त्यामुळे वाहनांसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक पर्यटकांच्या महागड्या कार पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्या आहेत. या घटनेची चित्रफीत सध्या समाज माध्यमांवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. हिमाचल प्रदेशातील भागसू हे ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथे देशभरातून हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. अशात ही ढगफुटी झाल्याने शेकडो पर्यटक घटनास्थळी अडकून पडले आहेत.

Leave a Reply