संपादकीय संवाद – आजतरी महाआघाडीचे खरे दिसत नाही

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत असा आरोप करून काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज खळबळ उडवून दिली आहे. अर्थात नंतर त्यांनी सारवासारव केल्याचीही बातमी माध्यमांवर फिरते आहे. मात्र ही पश्चातबुद्धीच म्हणावी लागेल हा प्रकार बघता महाआघाडी सर्वकाही आलबेल आहे आणि आमचे सरकार ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे असा केला जात असलेला दावा व्यर्थ तर नाही ना? अशी शंका घेता येऊ शकते.
नाना पटोले हे मुळातच आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ते काहीही बोलतांना कुणाचीही भीडमुर्वत ठेवत नाही जिथे नरेंद्र मोदींसारख्यांना नानांनी शिंगावर घेत भाजप सोडली तिथे उद्धव ठाकरे हे किस खेत कि मुलीच म्हणावे लागेल. गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान नानांनी मी खासदार असतांना माझे फोन टॅप केले जात होते असा आरोप केला होता . हा आरोप झाल्यावर त्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही गृहमंत्र्यांनी सभागृहात दिल्याचे जाहीर केले आहे. त्यावेळी नाना भाजपमध्ये असले तरी ते बंडखोर म्हणून विख्यात होते. ही बाब लक्षात घेता त्यांचे फोन टॅप झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र इथे तर मित्रपक्षाकडूनच नानांवर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला गेला आहे. नाना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आज महाराष्ट्रातील महाआघाडी सरकार गठीत झाले ते काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे सुरुवातीला शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले होते. बराच वेळ काँग्रेस कुंपणावरच होते, नंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी बऱ्यापैकी नाकदुऱ्या काढल्यावर काँग्रेस सत्तेत सहभागी झाली. आजही काँग्रेसने पाठिंबा काढला तर सरकार कोसळू शकते अश्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नानांवर पाळत ठेवण्याचे उद्योग का केले असतील? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. जर पाळत ठेवत नसतील तर नानांनी हा आरोप का करावा? हा मुद्दाही सध्या चर्चिला जातो आहे.
नाना सध्या वारंवार स्वबळाची भाषा बोलत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली असावी अशी शंका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. हा मुद्दा सुद्धा नाकारता येत नाही. ज्यावेळी महाआघाडीतील तीनही पक्ष भविष्यातील निवडणुका एकत्र लढतील असा दावा शरद पवार आणि उद्धव ठाकरे करतात त्याचवेळी काँग्रेसचे नेते मात्र स्वबळाच्या गोष्टी करतात. त्यामुळेच शंकेला वाव मिळतो.
अश्या परिस्थितीत महाआघाडीत सर्वकाही आलबेल सुरु आहे असा दावा करणे हे चुकीचेच ठरते मात्र राजकीय नेते एकच गोष्ट दहादा ओरडून सांगत असतात भलेही ती खोटी असेल तरीही, तसाच हा महाआघाडीचा प्रकार असावा अशी शंका येते. खरे खोटे काय त्याचे उत्तर येणारा काळच देईल मात्र आज तरी महाआघाडीचे काही खरे दिसत नाही हे नक्की.

अविनाश पाठक

Leave a Reply