लखनौ : १२ जुलै – जागतिक लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील भाजपच्या योगी सरकारने नवे लोकसंख्या नियंत्रण धोरण आणले आहे. तर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनीही लोकसंख्या नियंत्रण धोरणावर लवकरच निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे. अशातच मंदसौरमधील भाजपचे खासदार सुधीर गुप्ता यांनी मुक्ताफळं उधळली आहेत. भारताची लोकसंख्या वाढवण्यात बॉलिवूड अभिनेता आमीर खानसारखे लोक कारणीभूत असल्याचं गुप्ता म्हणाले.
देशाची लोकसंख्या नियंत्रणाबाहेर जाण्यास आमीर खानसारख्या लोकांचा हात आहे. हे देशाचं दुर्दैवं आहे, असं गुप्ता म्हणाले. गुप्ता यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. आमीर खान यांना पहिली पत्नी रीना दत्तापासून २ मुलं आहेत. दसरी किरण राव मुलांसह कुठे भटकेल याची चिंता नाही. पण आजोबा आमीर तिसरीच्या शोधात आहेत. हा एका अभिनेत्याचा संदेश आहे …? असा सवाल त्यांनी केला आहे.
२०२१-३० पर्यंत यूपीत नवे लोकसंख्या धोरण लागू राहील. गरीबी आणि निरक्षरतेला वाढती लोकसंख्या कारणीभूत आहे. काही समाजांमध्ये लोकसंख्येबाबत जागरूकतेचा अभाव आहे. यामुळे जनजागृती करण्याची गरज आहे. नवीन लोकसंख्या धोरण २०३० पर्यंत लागू राहील. समाजांमध्ये लोकसंख्येचं संतुलन कायम ठेवण्यासाठी केंद्रीय प्रयत्नांची गरज असल्याचंही योगी सरकारने म्हटलं आहे.