मुंडे समर्थकांचे राजीनामा सत्र सुरूच, पंकजा मुंडे उद्या घेणार नाराज समर्थकांची भेट

बीड : १२ जुलै – भाजपमध्ये अजूनही राजीनामा सत्र सुरुच आहे. आज पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कट्टर समर्थकांनी राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आलं. याचे पडसाद आता उमटताना दिसत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर मी आणि प्रीतम दोघेही नाराज नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र दुसरीकडे मुंडे समर्थकांनी राजीनामा अस्त्र बाहेर काढले आहे.
पंकजा यांचे समर्थक आणि बीड भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के ७७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. मंगळवारी म्हणजेच उद्या पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही समजतंय.
प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात डावलण्यात आलं. त्यानंतर बीड जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यासंदर्भात राजेंद्र मस्के यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लिहिलं आहे. मस्के उद्या चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेणार आहेत. दरम्यान पदांचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या जयश्री मस्के यांचाही समावेश आहे.
पंकजा मुंडे कालपासून दिल्लीत आहेत. दिल्लीत जाऊन त्यांनी राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीस उपस्थिती लावली. भाजप पक्षाचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांची त्यांनी भेट घेतली. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही त्या भेटल्या. दरम्यान उद्या पंकजा मुंडे यांनी मुंबईत समर्थकांची बैठक बोलावली आहे.
बीड, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, जालना मध्ये ही राजीनाम्याचं सत्र पोहोचलं. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती आणि जिल्हा उपाध्यक्ष यांनी राजीनामे देत नाराजी व्यक्त केली आहे. अहमदनगरमध्येही दोघांनी राजीनामे दिला आहे. मुंडे भगिनींच्या समर्थक असलेल्या पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपच्या सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी सुद्धा आपल्या राजीनामा दिल्याचं समजतंय. या दोघांनीही भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे राजीनामे सोपवले आहेत.

Leave a Reply