नागपूर : १२ जुलै – नागपुरात आज एक अजब प्रकार घडला आहे. नागपूरच्या फुटाळा तलावात युवकाने बाईकसह उडी मारली. युवकाने आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात बाईकसह उडी मारल्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, पोलिसांनी मच्छिमारांच्या मदतीने बाईक बाहेर काढली. मात्र अजूनही युवकाचा पत्ता लागला नाही. या युवकाचा शोध सुरूच आहे. मात्र या तरुणाने हे टोकाचं पाऊल का उचललं असा प्रश्न उपस्थितांना पडला आहे.
फुटाळा तलाव परिसरात नागपूरकरांची रेलचेल असते. मात्र सध्या कोरोनाकाळामुळे ही वर्दळ नेहमीपेक्षा कमी आहे. आज दुपारच्या सुमारास एक तरुण या ठिकाणी बाईक घेऊन आला. बघता बघता त्याने आहे त्या स्पीडने आपली बाईक थेट तलावात घातली. तरुणाच्या या कृत्याने उपस्थितांना काही वेळ नेमकं काय होतंय हेच कळलं नाही.
या तरुणाने वेगाने बाईकसह तलावात उडी घेतली. या प्रकाराने गोंधळून गेलेल्या उपस्थितांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन, मदत आणि बचावकार्य सुरु केलं. पोलिसांनी स्थानिक मच्छिमारांच्या सहाय्याने बाईक बाहेर काढली. अजूनही त्या तरुणाचा शोध सुरु आहे. या तरुणाने आत्महत्येच्या हेतून हे कृत्य केलं असावं, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.