पुणे: १२ जुलै-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचे अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल तयार असून, त्याची आता अंतिम तपासणी सुरू आहे. येत्या १५ जुलैच्या सुमारास ऑनलाइन निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे राज्यातील दहावीची परीक्षा रद्द करून इयत्ता नववीसाठी ५० टक्के व दहावीचे ५० टक्के, अशा एकूण १०० टक्के गुणांद्वारे मूल्यमापन करण्यात आले आहे. दरम्यान, निकाल तयार करण्यासाठी शाळास्तरावर समित्या स्थापन केल्या होत्या. निकाल तयार करून विषयनिहाय गुण संगणक प्रणालीत भरण्यासाठी वेळापत्रकही जाहीर झाले होते.
राज्यात १६ लाख विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांचे निकाल शाळास्तरावरून विभागीय मंडळाकडे आलेले असून, त्याची तपासणी सुरू आहे. निकालात काही त्रूटी राहू नयेत, यादृष्टीने योग्य ती दक्षता घेतली जात आहे. निकालाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.