नागपूर : १२ जुलै – शहरातील सामाजिक, राजकीय, साहित्य, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ उभारण्यात आलेल्या वेगवेगळ्या म्यूरलमुळे नव्या पिढीला शहरातील इतिहासाची जाण होईल. शिवाय त्यांना यातून प्रेरणाही मिळेल, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
महापालिकेच्या वतीने व वर्धमान को.ऑपरेटिव्ह बँक लि.च्या सहकार्याने सिव्हिल लाईन्स परिसरात बोले पेट्रोल पंप चौक ते जीपीओ चौक दरम्यानच्या मार्गालगत ए.बी. बर्धन, कवी ग्रेस, मा.गो. वैद्य, सुमतीताई सुकळीकर, लोकनायक बापूजी अणे, विदर्भवीर जांबुवंतराव धोटे, पद्मश्री डॉ.बी.एस. चौबे आणि पद्मभूषण मौलाना अब्दुल करीम पारेख यांचे म्यूरल उभारण्यात आले आहेत. याचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. दीपक भगत यांनी या म्यूरलची निर्मिती केली आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले, नव्या पिढीला फिरताना नाविन्यपूर्ण रितीने शहराच्या इतिहासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचे चरित्र ओळखता यावे, समजून घेता यावे, यासाठी हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असेही फडणवीस म्हणाले. सिव्हिल लाईन्सच्या हिरव्यागार मार्गालगत सुंदररित्या शहरातील दिग्गजांच्या स्मृतीसह त्यांच्या कार्याचा वारसा जपला जात आहे, याचा आनंद असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले.
या आठही म्यूरलच्या लोकार्पणप्रसंगी आठही गणमान्य व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यासह खासदार विकास महात्मे, आमदार विकास ठाकरे, आमदार प्रवीण दटके, माजी खासदार अजय संचेती, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, संयोजक नगरसेवक निशांत गांधी, अनिल पारेख, नरेश पाटनी, अनिल अग्रवाल, उन्नती फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल कोटेचा, युगल रायलू, प्रेमलता तिवारी, दिनेश पारेख, सय्यद मुमताज आदी उपस्थित होते.
उत्तर प्रदेशाप्रमाणे देशातही लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची गरज असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. यावेळी ते प्रसार माध्यमाशी बोलत होते. उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची तयारी तेथील राज्य सरकारने केली आहे. ज्या लोकसंख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होणाऱ्या राज्यात हा कायदा आणणे आवश्यक आहे. सोबतच गरज पडल्यास देशातही हा कायदा आणणे आवश्यक आहे. परंतु बळजबरी न करता हा कायदा आणला गेला पाहिजे. कारण लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणेही गरजेचे असल्याचे फडणवीस म्हणाले.