जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात, अमित शाह यांनी हजेरी लावत केली पूजा

नवी दिल्ली : १२ जुलै – आजपासून जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात होत आहे. ओडिशामधल्या पुरी येथे दरवर्षी ही यात्रा भरवली जाते. मात्र, यंदाच्या वर्षी करोना प्रादुर्भावामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करत मर्यादित स्वरुपात ही रथयात्रा भरवली जाणार आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिरात हजेरी लावत तिथे पूजा केली. देशातल्या अनेक नेत्यांनीही या यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
अमित शाह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आरती करतानाचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी आपल्या ट्विटमध्ये त्यांनी भगवान जगन्नाथ यांचा आशीर्वाद सर्वांवर कायम राहो अशी प्रार्थनाही केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, जगन्नाथ रथयात्रेच्या मंगल मुहुर्तावर मी अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरात होणाऱ्या आरतीमध्ये अनेक वर्षांपासून सहभागी होत आहे. प्रत्येकवेळी इथे आलं की एक वेगळीच उर्जा मिळते. आजही महाप्रभूंची आराधना करण्याचं सौभाग्य लाभलं. महाप्रभू जगन्नाथ सर्वांवर आपली कृपादृष्टी कायम ठेवो ही प्रार्थना!
जगन्नाथ रथयात्रा के शुभ अवसर पर मैं अहमदाबाद के जगन्नाथ मंदिर में कई वर्षों से मंगला आरती मंक भाग लेता आ रहा हूँ और हर बार यहाँ एक अलग ऊर्जा की प्राप्ति होती है।
न्यायालयाने करोनाच्या डेल्टा व्हेरिएंट आणि तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन ओडिशा सरकारच्या निर्णयाला सहमती दर्शवली आहे आणि संपूर्ण राज्यात रथयात्रा काढण्यावर बंदी घातली आहे. गेल्या वर्षीही करोना नियमांचं पालन करुनच ही यात्रा भरवण्यात आली होती.
पुरी जगन्नाथ मंदिराचे प्रशासक अजय जेना यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं, “गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही ओडिशा सरकारने सर्वोच्च न्यायालय आणि एसओपीच्या आदेशानुसार रथयात्रा भाविकांविना करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह येईल अशा आणि संपूर्ण लसीकरण झालेल्या रथ चालकांना यात्रेत येण्याची परवानगी देण्यात येईल. पोलिस कर्मचारी वगळता सुमारे १००० अधिकारी तैनात केले जातील. ”

Leave a Reply