आधार कार्डमुळे ९ वर्षाआधी हरवलेल्या मुलाला सापडले खरे आई-वडील

नागपूर : १२ जुलै – आधार क्रंमाक ही प्रत्येक भारतीयांची ओळख आहे. सर्वच क्षेत्रात आधार क्रमांकाचा वापर आणि उपयोग ही वाढला आहे. याच आधारकार्डमुळे एका कुटुंबाला तब्बल ९ वर्षामुळे त्यांचा हरवलेला मुलगा परत मिळाल्याची घटना समोर आली आहे. लहानपणी हरवलेल्या मुलाचे खरे आई-वडील शोधण्यात या आधारकार्डचा उपयोग झाला आहे. अमन असे त्या मुलाचे नाव आहे. तो बेवारस अवस्थेत सापडल्यानंतर नागपूरच्या दामले दाम्पत्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला दत्तक घेतले होते. मात्र आधार कार्डच्या मदतीने पुन्हा त्याला त्याचे खरे आई वडील मिळाले आहेत. तब्बल नऊ वर्ष दामले कुटुंबीयांनी स्वत:च्या मुलासारखा त्याचा सांभाळ केला होता. मात्र, एके दिवशी खऱ्या आई-वडिलांकडे सोपवावे लागेल, अशी कल्पनाही कधी दामले कुटुंबातील सदस्यांनी केली नव्हती.
नागपूरच्या नवा नकाशा परिसरात दामले कुटुंबीय राहते. समर्थ दामले यांच्या कुटुंबात पत्नी लक्ष्मी व एक मुलगा आणि एक मुलगी आहे. २०१२ साली या दामले कुटुंबात एक नवा सदस्य आला. तो म्हणजे अमन. अमन हा त्यावेळी सुमारे ९ वर्षाचा होता. नागपूर रेल्वे स्टेशनवर तो पोलिसांना बेवारस स्थितीत सापडला होता. त्याला बोलता येत नव्हते व समजतही नव्हते. चाईल्ड लाईनच्या मदतीने त्याला बालसुधार गृहात ठेवण्यात आले. बाल सुधार गृहातून दामले दाम्पत्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अमनला दत्तक घेतले, त्याचे संगोपण व्यवस्थित सुरू होते. दामले यांनी त्याला शाळेत देखील टाकले होते. पुढे अमनचे आधारकार्ड काढण्यासाठी दामले कुटुबीयांनी प्रयत्न सुरू केले. पंरतु त्यात तांत्रिक अडचणी येऊ लागल्या होत्या.
दामले कुटुंबात वाढत असलेल्या अमनचे आधार कार्ड काढण्यासाठी दामले कुटुंबांनी प्रयत्न सुरूच ठेवले होते. प्रत्येक वेळी काहीतरी तांत्रिक कारणास्तव आधार कार्ड काही तयार होत नसल्यामुळे समर्थ दामले यांनी मानकापूरच्या आधार सेवा केंद्रात अमनच्या आधारकार्डासाठी प्रयत्न केला. तिथे आधार केंद्राचे केंद्रीय व्यस्थापक अनिल मराठे यांची त्यांनी भेट घेतली. मराठे यांनी प्रयत्न केल्यावर त्या मुलाचे नाव अमन नसून मोहम्मद आमिर असल्याचे समोर आले, शिवाय त्याचे आधार कार्ड आधीच तयार झाले असून तो मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्याचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली. त्यावेळी बेवारस अवस्थेत आढळलेल्या अमनचा आश्चर्याकारकरित्या त्याच्या आई वडिलांचा थांगपत्ता लावण्यास यश आले.
मराठे यांनी पुढाकार घेऊन अमनच्या खऱ्या आई वडिलांचा शोध घेतला. घरच्यांना कळवण्यात आले. तब्बल नऊ वर्षांनंतरही मुलगा सुखरूप असल्याचे समजल्यावर त्यांनाही सुखद धक्का बसला. आमिरच्या खऱ्या आई-वडिलांनी नागपूर गाठले. लहानपणी दुरावलेल्या आई-वडिलांना अमीर ओळखू शकला नाही. पण हेच तुझे खरे आई-बाबा असल्याचे दामले कुटुंबीयांनी त्याला समजावले. पुढची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दामले दाम्पत्य अमीर उर्फ अमनला घेऊन स्वतः जबलपूरला रवाना झाले. मात्र ९ वर्ष ज्यांना आपले आई-वडील मानले त्यांच्या पासून विभक्त होण्याचं दुःख अमनला सहन होत नसल्याने तो पुन्हा दामले कुटुंबाच्या भेटीला नागपूरला आला आहे. एखाद्या सिनेमाची पटकथा शोभेल असाच आहे अमनच्या ओळखीचा जीवन प्रवास ठरला आहे. तसेच सर्व सामान्याच्या अधिकार असलेल्या आधार कार्डची आणखी एक उपयोगिता समोर आली आहे.

Leave a Reply