सध्या लॉकडाऊन हळूहळू उघडत असतानाच पुन्हा तिसऱ्या लाटेसाठी लॉकडाऊन वाढवणार काय? अशी चर्चा सुरु झाली आहे परिणामी नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मार्च २०२० पासून सुरु झालेल्या या लॉकडाऊनमुळे जनसामान्य खरोखरीच जेरीस आलेले दिसत आहे.
वस्तुतः लॉकडाऊन करण्यामागे जी भावना आहे तिचा विचार होतो आहे काय? आणि ती भावना साध्य होते आहे काय? याचा विचार प्रशासनाने करायला हवा. लॉकडाऊन लावण्यामागे नागरिकांचा परस्परांशी संपर्क कमीत कमी यावा ही भावना होती. आता मात्र कितीही लॉकडाऊन लावला तरीही संपर्क टळत नाही अशी परिस्थिती दिसते आहे. लॉकडाऊन संपवतांना सुरुवातीला फक्त ४ तास व्यापार आणि व्यवहार सुरु ठेवण्याची परवानगी दिली मात्र या चार तासात नागरिक नको तेवढी गर्दी करतात आणि परिणामी संपर्क नको तेवढा वाढतो. यामुळे ज्या हेतूने लॉकडाऊन केला जातो तो हेतू साध्य होत नाही असे दिसून आले आहे.
या लॉकडाऊनने गेल्या सव्वा वर्षात अर्थचक्र पूर्णतः थांबलेले आहे. परिणामी लाखो मजुरांना स्थलांतर करावे लागले आहे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्याने ते बेरोजगार झालेले आहेत. व्यापारी, उद्योजक आणि दुकानदार अक्षरशः घरी बसलेले आहेत. शाळा बंद पडल्या आहेत. परिणामी शिक्षणाची पार ऐसीतैसी झालेली आहे. जनसामान्य त्यामुळे हवालदिल आहेत.
या सर्व बाबींचा प्रशासनाने आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. काही व्यापाऱ्यांनी अशी सूचना केली आहे की व्यापार उद्योग आणि व्यवहार पूर्वीसारखेच सुरु ठेवावे आणि त्यांना प्रसंगी वेळ वाढवून द्यावी एरवी सकाळी ९ ते रात्री ८ दुकाने उघडी राहणार असतील तर ती सकाळी ८ ते रात्री १० अशी उघडी ठेवावी फक्त नागरिकांवर लक्ष ठेऊन त्यांना गर्दी टाळण्यासाठी सांगावे आणि परस्पर संपर्क कसा टळेल याची काळजी घ्यायला लावावी असे केले तर आपसुकच संपर्क कमी होईल आणि कोरोनाचा संसर्ग टळेल अशी ही सूचना आहे.
प्रशासनाने अश्या प्रकारच्या समाजातील सुजाण नागरिकांकडून येणाऱ्या सूचनांचा विचार करून आता लॉकडाऊनचे नियोजन करायला हवे. लॉकडाऊन आता वाढत राहिला तर जनसामान्य पेटून उठतील आणि हा असंतोषाचा भडका विझविणे प्रशासनाला जड जाईल हे लक्षात ठेवायला हवे.
अविनाश पाठक