विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार – शरद पवार

पुणे: ११ जुलै- राज्यात महाविकास आघाडी सरकार असलं तरी, काँग्रेसच्या नेत्यांकडून वारंवार स्वबळाचा नारा देत मनातील खदखद व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारंवार आगामी निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा देत आहेत. दरम्यान, आज रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमच्या तीन पक्षांचा निर्णय झाला आहे. विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं आणि ते काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळे कोणीही काही बोलायचा संबंधच येत नाही. आम्हा तिन्ही पक्षांना काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे. त्या निर्णयावर आम्ही कायम आहोत, असं शरद पवारांनी सांगितलं.
स्वबळाबाबत विचारता ते म्हणाले, प्रत्येकजण आपला राजकीय पक्ष मोठा करण्याच्या प्रयत्नात असणार. काँग्रेसने भूमिका घेतली असेल तर, त्यात काहीही चुकीचं नाही. आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्रित चालवत नाही. आम्ही प्रत्येकजण पक्ष वेगळ्या पद्धतीने चालवतो. प्रत्येकाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढावी, अशी इच्छा असणार. यात काहीही चुकीचं नाही. त्यामुळे यात गैरसमज असण्याचं काहीही नाही. सरकार एक विचारानं आहे की नाही हे महत्वाचं आहे, असं शरद पवार म्हणाले.

Leave a Reply