माझ्या काँग्रेस प्रवेशानंतर पक्षात कुजबुज सुरू : माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख

अमरावती: ११ जुलै- माझा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर पक्षात एक वेगळीच कुजबुज सुरू झाली आहे. मी पक्षात गटबाजीसाठी आलेलो नाही. आता आपले काही खरे नाही, आपल्याला काही मिळणार नाही, अशी जी चर्चा होते, ती थांबविली पाहिजे. कोणाताही एक व्यक्ती निवडणूक जिंकून देऊ शकत नाही. येणारी मनपा निवडणूक सर्वांना सोबत घेऊन आपल्याला लढायची आहे, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केले. माझ्या प्रवेशासाठी यशोमती ठाकूर यांनी जोरकस प्रयत्न केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शनिवारी प्रवेशानिमित्त डॉ. देशमुखांचा सत्कार आयोजिण्यात करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष पालकमंत्री यशोमती ठाकुर होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून शंकरराव हिंगासपुरे, वसंतराव साऊरकर, मुजफ्फर मामू, शहराध्यक्ष बबलू शेखावत, विलास इंगोले, शेख जफर, किशोर बोरकर होते. यावेळी डॉ. देशमुख समर्थकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
डॉ. देशमुख म्हणाले, राजकारणात मित्राला अडचणीत आणून शत्रूला मदत करणारे काही लोक असतात, त्यांच्यापासून आपण लांब राहीले पाहिजे. जुन्या व नव्या कार्यकर्त्यांना सोबत घ्यावे लागेल. कोणतेही किंतुपरंतु मनात न ठेवता आपण काम करू आणि काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देऊ.

Leave a Reply