मराठा आणि ओबीसी आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे तर अडले कुठे ? – राज ठाकरेंचा सवाल

पुणे : ११ जुलै – मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे तर अडलं कुठं?, असा सवाल करतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांची माथे भडकावून केवळ राजकारण करायचे आहे का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पक्षीय नेत्यांना केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आले होते. त्यांच्या हस्ते पुण्यातील शहर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी हा सवाल केला. खूप पूर्वी मराठा मोर्चा निघाला होता. त्यावेळी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी सर्वांना आरक्षण मान्य होतं. जर सर्वांनाच आरक्षण मान्य होतं तर अडलं कुठे? की केवळ इश्यू करायचा आहे? मराठा तरुणांची निव्वळ डोकी भडकवायची आहे का?, असा सवाल राज यांनी केला.
जे मराठा आरक्षणाच्या बाबतीत आहे. तेच ओबीसी आरक्षणाबाबत आहे. ओबीसींचं आरक्षणही सर्वांना मान्य आहे तर अडलं कुठे? तुम्ही कोर्टात आरक्षणाची बाजू व्यवस्थित का मांडत नाहीत? एकमेकांकडे बोट का दाखवत आहात? एकदा या सर्वांना एका व्यासपीठावर आणा आणि विचारा, असं ते म्हणाले.
निवडणुकीत हे नेते मतदान मागायला येतात. तेव्हा समाजाने या नेत्यांना जाब विचारावा. तुम्हाला आमचं आरक्षण मान्य आहे तर अडलं कुठं? असं त्यांना समाजाने विचारलं पाहिजे. आमचा वापर तर केला जात नाही ना? याचाही समाजाने विचार करायला हवा, असंही ते म्हणाले.
ईडीचा गैरवापर होत आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर मी खडसेंच्या सीडीची वाट बघतोय, असं राज म्हणाले. यंत्रणांचा गैरवापर होत आहे. काँग्रेसचं सरकार असतानाही गैरवापर होत होता. भाजपचं सरकार असतानाही होत आहे. यंत्रणा काय तुमच्या हातातील बाहुली आहे का? या यंत्रणांचा चुकीचा वापर करून चालणार नाही. ज्यांनी गुन्हे केले ते मोकाट आहेत. आणि इतरांवर कारवाई होत आहे. हे चुकीचं आहे, असंही ते म्हणाले.
नवं सहकार खातं निर्माण करण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळींना धोका निर्माण झाला आहे का?, असा सवाल राज यांना विचारण्यात आला. त्यावर तुम्ही पवार साहेबांनाच विचारा. तेच करेक्ट सांगतील, असं म्हणून त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर समाधानी आहात का?, असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावर लॉकडाऊनमुळे सरकारचा कारभार पाहता आला नाही. त्यामुळे समाधान कशावर व्यक्त करावं? असा सवाल त्यांनी केला.
यावेळी राज यांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं स्पष्ट केलं. म्हटलं तर महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. कार्यालयाची गरज होती म्हणून नवं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. अजून निवडणुकांना वेळ आहे. सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. शेड्युलप्रमाणे फेब्रुवारीत निवडणुका व्हायला पाहिजे, पण पुढे काय होईल माहीत नाही, असं सांगतानाच निवडणुकीची रणनीती काय असेल हे तुम्हाला का सांगू?, असा सवाल त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना केला.

Leave a Reply