नवी दिल्ली : ११ जुलै – व्हर्जिन गॅलेक्टिकच्या मदतीने भारतीय वंशाच्या सिरीषा बांदला ( वय ३४) या रविवारी अवकाशात झेपावणार आहेत. कल्पना चावला व सुनीता विल्यम्स यांच्यानंतर अवकाशात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या त्या तिसऱ्या महिला ठरणार आहेत.
बांदला यांचा जन्म आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे झाला असून त्या टेक्सासमधील ह्यूस्टन येथे लहानाच्या मोठय़ा झाल्या. त्या आता सर रिचर्ड ब्रॅन्सन यांच्यासमवेत अवकाशात जाणार असून यात इतर पाच जणांचा समावेश आहे. टू युनिटी या अवकाशयानाच्या मदतीने त्या अवकाशात जाणार असून न्यू मेक्सिको येथून हे उड्डाण होणार आहे. बांदला यांचा या मोहिमेतील अवकाश यात्री म्हणून असलेला क्रमांक ००४ असून संशोधक म्हणून त्या या मोहिमेत सहभागी होत आहेत. बांदला यांचे शिक्षण परडय़ू विद्यापीठात झाले असून त्यांचा संशोधनातील अनुभव मोठा आहे. बांदला या व्हर्जिन गॅलेक्टिकच्या सरकारी कामकाज व संशोधन मोहिमा विभागाच्या उपाध्यक्षा आहेत. टू युनिटी यानाचे हे २२ वे उड्डाण असून ११ जुलैला ते अवकाशात झेपावणार आहे. या अवकाशयानात कंपनीचे संस्थापक सर ब्रॅन्सन, चार मोहीम तज्ज्ञ, दोन वैमानिक यांचा समावेश झाला आहे.
मी नेहमी स्वप्ने पाहिली. माझ्या आईने मला नेहमीच असे सांगितले की, काम हाती घेतले आहे ते कधी सोडू नकोस. तिचे स्वप्न खरे करण्याची हीच वेळ आहे असे सिरीषाने म्हटले आहे.