नाना पटोलेंनी साधला मित्रपक्षांवर निशाणा

पुणे : ११ जुलै – महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वबळाचा नारा देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही खदखद कार्यकर्त्यांसमोर मांडली आहे. इतकंच नाही, तर त्यांनी पुन्हा एकदा स्वबळाच्या नाऱ्याचा पुनरुच्चारही केला आहे. लोणावळा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. त्याचबरोबर पुण्याच्या पालकमंत्रीपदी काँग्रेसचा व्यक्ती बसवण्याची शपथ घ्या, असं आवाहन पटोले यांनी कार्यकर्त्यांना मेळाव्यात केलं.
कार्यकर्त्यांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, “मी जे बोललो त्यात माघार घेणारच नाही. स्वबळावरच निवडणूक लढवणार. त्यामुळे आपण कामाला लागा. मी माध्यमांशी बोलताना म्हणालो की, मुख्यमंत्र्यांनी काल शिवसैनिकांना कामाला लागण्याबद्दल सांगितलं. मग मी बोललो होतो तर त्रास होत होता, ते बोलले तर ठीक आहे. काही नाही”, असा चिमटा पटोले यांनी उद्धव ठाकरेंना काढला.
यावेळी अजित पवार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. “आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची कामं करतात… आपल्या लोकांची कामं करतात का? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते त्यांनी ठरवायचं… कारण सही त्यांची लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही,” असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
“कोणत्याही समितीवर नावं पाठवायची असतील, तर पालकमंत्र्यांची सही लागते. हा जो त्रास आहे, या त्रासाला तुम्ही आपली ताकद बनवा. या त्रासाला आपली मानसिक कमजोरी बनवू नका. जो त्रास तुम्हाला आज मिळतोय… आमचा हिस्सा असतानाही आम्हाला देत नाहीत ना ठीक आहे. पण मी माझ्या कर्माने उद्याच्या काळात इथला पालकमंत्री बनेल… आमच्या पक्षाचा माणूस या खुर्चीवर बसेल ही ताकद घेऊन निघालं पाहिजे. ज्या लोकांना तडजोड करायची नसेल, सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काही बोलायचंच नाही. तो राग आपल्याला ताकद बनवायचा आहे”, असं सांगत नाना पटोलेंनी काँग्रेस कार्यकर्त्यांना स्वबळाच्या तयारीसाठी लागण्याची सूचना केली.

Leave a Reply