जिल्हाधिकाऱ्यांनी शेतात जाऊन केली भात रोवणी

गडचिरोली: ११ जुलै- गडचिरोली जिल्ह्यात पावसामध्ये थोडासा खंड पडलेला होता. आता मागील दोन दिवसात चांगला पाऊस झाल्याने धान रोवणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. अशा वेळी जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांना प्रोत्साहन दिले. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी साखरा गावातील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष भात रोवणी केली.
दमदार पावसानंतर सर्वच शेतकऱ्यांनी भात रोवणीला जिल्ह्यात सुरूवात केली आहे. साखरा गावात कृषी विभागाने आयोजित केलेल्या रोवणी कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी सिंगला यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी त्यांनी शेतीमधील उत्पन्न वाढीसाठी आता यांत्रिकीकरण स्वीकारले पाहिजे, असे आवाहन शेतकऱ्यांना केले. परंपरागत शेतीमध्ये खूप मेहनत घ्यावी लागते, तसेच उत्पन्नही काही अंशी कमी राहते. यातून बाहेर पडून शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी जेणेकरून उत्पन्नही वाढेल आणि मेहनतही कमी करावी लागेल असे ते यावेळी म्हणाले. कृषी विभागाने नियोजन व मानव विकास योजनेतून ट्रॅक्टर वाटप व आवश्यक इतर सयंत्र वाटप योजना घेतली आहे. यातून शेतीमधील उत्पन्न वाढीबरोबरच त्यांचा शेतीमधील इतर ताणही कमी होणार असल्याचे जिल्हाधिकारी सिंगला यांनी सांगितले.

Leave a Reply