अँड. उज्ज्वल निकम यांना शिवसेनेचे आमंत्रण, मात्र, सध्या विचार नसल्याचा निकम यांचा खुलासा

मुंबई: १० जुलै- राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव दौऱ्यावर असलेले नगरविकासमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी उज्ज्वल निकम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अँड. उज्ज्वल निकम आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड बराचवेळ चर्चाही सुरु होती. या चर्चेचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही.
मागील महिन्यात जळगाव दौऱ्यावर असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उज्ज्वल निकम यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकनाथ शिंदे अँड. उज्ज्वल निकम यांना भेटल्याने शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही उज्ज्वल निकम यांना राजकारणात येण्याची ऑफर दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निकम यांना राज्यसभेवर पाठवण्याचा मानस होता. मात्र, निकम यांनी हा प्रस्ताव दोनवेळा नाकारला होता. आतादेखील उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना पक्षातर्फे राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आरक्षण उठल्यास तिकडून निवडणूक लढवण्याचा पर्यायही उपलब्ध होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.
यासंदर्भात बोलताना निकम म्हणाले, मी अद्याप राजकारणात येण्याचा विचार केलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझी बंद दाराआड चर्चा झाली. मात्र, त्याचा तपशील आत्ताच सांगता येणार नाही. यापूर्वी मी शरद पवार यांचा प्रस्तावही नाकारला होता. खासदार संजय राऊत आणि माझी गेल्या महिन्यातील भेट ही केवळ सदिच्छा भेट होती. माझे सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध असल्याने ते घरी येतात, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.

Leave a Reply