नागपूर्:१० जुलै- राष्ट्रीय महामार्गांवर वेगाने जाणारी वाहने आणि वाहनांचे दिवे वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४वर वाघ आणि बिबट्यांसह अनेक वन्यप्राणी मार्ग ओलांडताना मृत्युमुखी पडले आहेत. या महामार्गावरील खबरदारीच्या उपाययोजना हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. वाहनांचा आवाज आणि वाहनांचे दिवे ही वन्यप्राण्यांसाठी प्रमुख समस्या असल्याने आवाजी अडथळे हा पर्याय काही वन्यजीव अभ्यासकांनी सुचवला आहे
नागपूर ते जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४वर पेंचच्या बाजूने रस्त्याच्याकडेला बिबट्या दिसून आल्याने ही बाब पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४वर मध्यप्रदेशातील कुराई घाट परिसरात एक बिबट्या महामार्गाच्याकडेला बसला होता. या महामार्गावरून येणाऱ्या वाहनचालकांना तो दिसला. सुरुवातीला त्याला वाहनांची धडक बसून तो जखमी झाला असेल, असेच वाहनचालकांना वाटले. मात्र, अवघ्या काही मिनिटात त्याने आधी फलकावर आणि नंतर पलीकडे उडी मारली. या घटनेने वाहनचालक अवाक् झाले. या महामार्गावर महाराष्ट्राच्या बाजूने जुलै २०१९ मध्ये एक वाघ रस्ता पार करताना अपघातातून थोडक्यात बचावला होता. सुमारे वर्षभरापूर्वी एक बिबट्या महामार्गावर जखमी अवस्थेत बसलेला होता. त्यामुळे या महामार्गावर वन्यप्राण्यांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये त्रुटी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.