मुंबई: १० जुलै- १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा लेटर बॉम्ब टाकून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या पत्रामुळे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण, आता परबीर सिंगसुद्धा ईडीच्या रडारवर आले असून, लवकरच त्यांची चौकशी होणार, असल्याची माहिती समोर आली आहे.
१०० कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी अनिल देशमुख यांना एकापाठोपाठ समन्स बजावण्यात आले आहे. अनिल देशमुख यांनी अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुसरीकडे, ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले आहे ते परमबीर सिंग सुद्धा अडचणीत सापडले आहेत. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी लवकर परमबीर सिंग यांना चौकशीला बोलावून त्यांचा जबाब नोंदवणार आहे. त्यांना त्याबद्दल समन्स सुद्धा बजावला आहे. परंतु, परमबीर सिंग यांनी ईडी समोर हजर राहण्यासाठी काही कारणास्तव अवधी मागून घेतला होता. पण, आता परमबीर सिंग यांनासुद्धा ईडीच्या समोर हजर राहावे लागणार आहे.