काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतेच पुढील निवडणुकीत महाराष्ट्रात स्वबळावर काँग्रेसला सत्तेत आणीन असे विधान केले होते, मात्र आज काँग्रेसमध्ये सुरु असलेली भांडणे बघता नानांची ही इच्छा कितपत पूर्ण होईल याबाबत शंकाच वाटते आहे.
असे म्हणण्याला कारण झाले ते काँग्रेस पक्षात महाराष्ट्रातच सुरु असलेली भांडणे. इतर कुणी नाही तर दस्तुरखुद्द नाना पटोलेंचेच इतरांशी वाद आहेत आणि त्या वादाची परिणीती काल बघायला मिळाली. काल नागपुरात नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन जाहीर केले होते. त्यानुसार ते आंदोलन झालेही मात्र या आंदोलनात नागपुरातील एक हेवीवेट काँग्रेसशी नेते आणि विद्यमान महाआघाडी सरकारमधील मानती डॉ. नितीन राऊत यांनी नागपुरात असूनही दांडी मारली होती. या आंदोलनात नाना आणि सुनील केदार या दोघांनी सायकल चालवत जाऊन इंधन दरवाढीचा निषेध केला त्याला प्रसिद्धीही चांगली मिळाली मात्र त्यामुळे पोटशूळ उठलेले डॉ. नितीन राऊत आज सकाळी पहिल्याच विमानाने दिल्लीला रवाना झाले. त्यांनी सोबत माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनाही घेतले असून आज हे दोघेही नाना पटोलेंची तक्रार राहुल गांधींकडे करणार असल्याची माहिती मिळाली.
नाना आणि नितीन राऊत यांचे इतके फाटण्याचे कारण काय? असे वाचकांच्या मनात येईल. झाले असे की महाआघाडी सरकार स्थापन झाल्यावर काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या खात्यांमध्ये ऊर्जा खाते हे डॉ. नितीन राऊत यांना देण्यात आले होते. तर नाना पटोलेंना विधानसभा अध्यक्ष करण्यात आले होते. त्यावेळी बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष होते. २०२१ च्या सुरुवातीला पक्षश्रेष्ठींनी नानांकडे प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे देण्याचा निर्णय घेतला. तसे केल्यास नानांना विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागणार होता. तेव्हा नानांनी मी अध्यक्षपद सोडतो पण मला मंत्रिपद द्या असा आग्रह धरला, त्यावेळी त्यांनी ऊर्जा मंत्रिपद मिळावे अशीही इच्छा व्यक्त केली होती. तिथूनच दोघांचे फाटायला सुरुवात झाली. असे बोलले जाते.
नाना आणि डॉ. नितीन यांचे हे भांडण अगदी ताजे आहे मात्र काँग्रेसमध्ये अनेक गट आहेत आणि त्यांचे एकमेकांशी कधीच पटत नाही नागपूर जिल्ह्यात तिरपुडे विरुद्ध तिडके असा वाद होता. तर अगदी अलिकडल्या काळात चतुर्वेदी विरुद्ध मुत्तेमवार हा वाद रंगला होता. राज्यात ठिकठिकाणी असे असंख्य वाद आहेत त्यामुळे काँग्रेस पक्षातील काँग्रेसजन कधीच एकत्र आलेले दिसले नाहीत कारण एकच प्रत्येकाला सत्तेचे लोणी मटकावयाचे असते. ज्यांना मिळाले ते विरुद्ध इतर असा कायम संघर्ष असतो. परिणामी पक्षाचे खच्चीकरणच होत जाते.
ही परिस्थिती बदलायची असेल तर नानांना पहिले सर्वांना एकत्र घेऊन मानभेत मिटवावे लागतील. अन्यथा २०२४ मध्येही नियती त्यांना ना ना….. असेच म्हणेल याची जाणीव तत्यांनी ठेवायला हवी.
अविनाश पाठक