पावसाचे पाणी शिरले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, प्रशासनाची उडाली तारांबळ

नागपूर : ९ जुलै – नागपूर शहरात मान्सून दाखल झाल्यानंतर गुरुवारी पावसाने पहिल्यांदा दमदार हजेरी लावली. यामुळे उकाड्याच्या त्रासापासून नागपूरकरांचा सुटकारा झाला असला तरी या पावसाने मात्र, शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) प्रशासनाची चांगलीच पोलखोल केली. याचे कारण म्हणजे, गुरुवारी चक्क पावसाचे पाणी हे मेडिकल हॉस्पिटलमधील प्रसूती वॉर्डात शिरल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. यामुळे येथील कर्मचारी पाणी काढण्याच्या कामात व्यस्त झाले.
शहरातील मेडिकल हॉस्पिटल येथे नागपूरसह विदर्भ व शेजारील राज्य असलेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी ठिकाणांहून रुग्ण उपचारार्थ येत असतात. येथे नेहमीच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गर्दी पहायला मिळते. गुरुवारी सकाळपासून पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील विविध भागांमधील वस्त्या जलमग्न झाल्या होत्या. तर मुख्य रस्त्यांसह अनेक भागात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आल्याचे पहायला मिळाले. याचवेळी मेडिकल रुग्णालयात या पावसाने धावपळ उडवून दिली. मेडिकल रुग्णालयाच्या मध्यवर्ती भागात एक्सरे विभागापासून ते स्त्रीरोग ओपीडी, प्रसूती वॉर्डकडे पाणी वेगाने वाहू लागले. तेथून ते बाहेर जात होते. पाणी थोडेच असल्याने रुग्ण तेवढे लक्ष न देता त्यांची तेथून ये-जा सुरू होती. काही वेळापूरती स्त्री रोग बाह्य़ रुग्ण विभागातही रुग्णसेवेत अडचण येऊ लागली. प्रसूती वॉर्डातही तारांबळ उडाली. पाण्याची पातळी थोडी वाढलेली पाहून प्रशासनाने लगेचच पावले उचलली. हे समजताच अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे व इतर अधिकार्यांनी तेथे धाव घेतली. कर्मचार्यांच्या मदतीने येथून पाणी काढण्यात आले.

Leave a Reply