यवतमाळ : ८ जुलै – यवतमाळमध्ये वीज कोसळून मोठी जीवितहानी झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून २६ शेळ्या तर एका बैलजोडीचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वणी तालुक्यातील वरझडी (बंडादेवी) येथे वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर दोन महिला जखमी झाल्या. शंकर गणपत लोणबळे (३८) असे मृताचे नाव आहे. तर सुचिता मारोती काळे (५०) व पिगलाबाई लोणबळे (५०) अशी जखमी महिलांची नावे आहेत. आज दुपारी ही घटना घडली.
शंकर लोणबळे हे त्यांच्या शेतात मजुरांसह काम करीत असताना दुपारी अचानक वादळी पाऊस सुरू झाला. तेव्हा हे सर्वजण शेतातील झोपडीत आडोसा घेण्यासाठी गेले. काही वेळातच झोपडीवर वीज कोसळली. ती शंकर लोणबळे यांच्या अंगावर कोसळल्याने ते जागीच ठार झाले. त्यांच्यासोबत असलेल्या सुचिता काळै व पिगलाबाई लोणबळे गंभीर जखमी झाल्या. ही बाब लगतच्या शेतातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांनाही तत्काळ वणी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी शंकर लोणबळे यांना मृत घोषीत केले. जखमींवर उपचार सुरू आहेत. शंकर यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले आहेत. घटनेचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.
खातेरा येथे वीज पडून २६ शेळ्या ठार
पाटणबोरीच्या झरीजामणी तालुक्यातील खातेरा येथे आज बुधवारी सायंकाळी वीज कोसळून २६ शेळ्या ठार झाल्या. शिवारात शेळ्या चरत असताना अचानक विजांच्या कडकडाटांसह पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेळ्यांना एका झाडाखाली गोळा केले. नेमकी याच झाडावर वीज कोसळून २६ शेळ्यांचा मृत्यू झाला. या घटनेत शेळ्यांची राखण करणारे चारजण सुदैवाने बचावले असल्याची माहिती आहे.
बंदरपोड येथे वीज पडून बैलजोडी ठार
मारेगाव तालुक्यातील बंदरपोड येथे आज दुपारी झाडावर वीज कोसळून बैलजोडी ठार झाली. तालुक्यात दुपारी वादळी पाऊस झाला. यावेळी बंदरपोड येथील शेतकरी वासुदेव गणपत आत्राम यांनी आपल्या दोन्ही बैलांना शेतातीलच कडुनिंबाच्या झाडाला बांधून ते दुसरीकडे आसरा शोधत उभे राहिले. याचवेळी झाडावर वीज कोसळली यात झाडाला बांधलेले दोन्ही बैल ठार झाले. या बैल जोडीची किंमत एक लाखाच्या घरात असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. ऐन कोरोनाच्या संकटात अशा घटनेमुळे शेतकऱ्यांचं आणखी नुकसान झालं आहे.