मुंबई : ८ जुलै – ईडी चौकशी आणि छापेमारी यांचा संबंध राजकारणाशी लावणे चुकीचे आहे. एखाद्या व्यक्तीवर संशय आल्यावर कारवाई होत असते, असं सांगतानाच मूळ विषयापासून पळ न काढता एकनाथ खडसे यांनी चौकशीला सामोरे जावे, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलं आहे
प्रवीण दरेकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. माझ्यावरील कारवाईमागे राजकीय सुडाचा वास आहे, मी भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्यानेच माझी चौकशी सुरू आहे, असं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. त्यावर दरेकर यांनी पलटवार केला आहे. ईडीची कारवाई कोणत्याही सुडभावनेने होतं नसते. तपास यंत्रणा स्वायत्त असून त्यांच्या पद्धतीने ते काम करतात. त्यामुळे यामध्ये विनाकारण राजकारण करत मूळ विषयापासून पळ न काढता खडसे यांनी चौकशीला समोरं जायला हवं, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.
कुठलीही व्यक्ती चौकशीपासून पळ काढून आपल्या बचावाकरीता मार्ग शोधत असते. तेव्हा या सर्व प्रकरणातून संशयाला बळकटी मिळते. आपला जर दोष नसेल तर योग्य ती कागदपत्र सादर करून आपलं निर्दोषत्व सिद्ध करा. तसेच कोणत्याही चौकशीला सहकार्य करणं उत्तम ठरेल, असा सल्लाही दरेकर यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये होते. त्यांनीही ईडीकडून खडसेंची चौकशी होत असल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत जे काही बोलायचं ते ईडी बोलेल. मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. कायदा आपलं काम करत असतो. भाजपमध्ये अशा प्रकारे सुडाने काम करण्याची प्रथा नाही, असं फडणवीस म्हणाले.
ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपवर थेट आरोप केला होता. या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. भाजपसोडून राष्ट्रवादीत आलो. त्यानंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे, असं सांगतानाच जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असं खडसे म्हणाले.