मुंडे भगिनी नाराज नाहीत, उगाच त्यांना बदनाम करू नका – देवेंद्र फडणवीस

नाशिक : ८ जुलै – केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर भाजपमध्ये कुठे खुशी तर कुठे गम आहे. भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासह मुंडे गटात नाराजी पसरली आहे. पण, मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका, त्या नाराज नाही. निर्णय हा पक्षात वरिष्ठ स्तरावर घेण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नाशिकमध्ये शहर बससेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस उपस्थितीत होते. यावेळी माध्यमांशी बोलत असताना फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर आपली प्रतिक्रिया दिली.
‘केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरून मुंडे भगिनी नाराज, हे कोण म्हणत आहे. अशी काहीही चर्चा नाही. मंत्रिपद वाटपाचा निर्णय, पक्ष वरीष्ठ स्तरावरून घेतला जात असतो. त्यामुळे मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका, त्या नाराज नाही’ असं फडणवीस म्हणाले.
तसंच, नारायण राणे यांना मंत्रिपद मिळाले आहे. ते त्यांच्या कार्यक्षमतेमुळे मंत्रिमंडळात सामील झाले आहे. ते चांगल्या प्रकार काम करतील, असंही फडणवीस म्हणाले.
एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे, याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, ‘मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. एकनाथ खडसे प्रकरणात मी काय बोलणार. पुरावे असतील म्हणून ईडी चौकशी करत असेल’ असंही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांकडून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये गोपीनाथ मुंडे यांचे किती योगदान होते, हे ठणकावून सांगण्यात आले आहे. ही पोस्ट पंकजा मुंडे यांचासाठी काम करणाऱ्या माजी सहकारी संकेत सानप याने लिहिली आहे.
‘तुमचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत येऊनही तुम्ही कुणाच्या उंबरठ्यावर जाऊन लॉबिंग करत नाही. हे सारं प्रस्थापित शक्ती केंद्रांनी या आधीही अनुभवलेलं आहे. त्यामुळे ती चुक पुन्हा होणे नाही. एका गोपीनाथ मुंडेचे दोन गोपीनाथ मुंडे कसे होऊ देतील हो? राजकीय सत्ताधाऱ्यांपैकी कुणालाच नको आहेत दोन दोन गोपीनाथ मुंडे. आज आपल्या पंकजाताईचं वय 42 आहे तर प्रितमताईंचं 38,असे अनेक घाव सोसत सोसत तर त्यांना गोपीनाथ मुंडे व्हायचं आहे’ असं म्हणत समर्थकांनी भावनिक सादही घातली आहे.

Leave a Reply